नानांच्या खोडकर नाना तऱ्हा
esakal September 21, 2025 09:45 AM

गावच्या मालका .........लोगो

वसंत रामचंद्र उपाख्य बंडुनाना पाध्ये हे माझे चुलत आजोबा. आम्ही त्यांना नुसतेच नाना म्हणायचो. कारण, ते चौऱ्याहत्तराव्या वर्षी गेले; मात्र मानसिकता वय अठरा असल्यासारखी होती. त्यामुळे त्यांना स्वत:लाच आजोबा म्हटलेले आवडत नसे. नानांचा मुंबईत गादी कारखाना होता. कालांतराने नानांनी तो कारखाना बंद करून संगमेश्वरला सद्गुरू गादी कारखाना अशा नावाने सुरू केला. त्या कारखान्याचे आउटलेट मुंबई-गोवा महामार्गावरच होते. हे नाना नानातऱ्हेने गंमती करत. त्या अर्थाने त्यांचे व्यक्तीमत्व खोडकर म्हणायचे.........

rat२०p८.jpg-
२५N९२७९८
- अप्पा पाध्ये-गोळवलकर
गोळवली, संगमेश्वर
----------
नानांच्या खोडकर नाना तऱ्हा...
नानांचा स्वभाव प्रचंड विनोदी. कोणाची कधी टोपी उडवतील, हे सांगता येत नसे. कधी कधी नानांना लहर यायची, गम्मत करायची. तेव्हा काय करायचे नाना माहित्येय? खाण्याचा सोडा घ्यायचे, त्याच्या छोट्या छोट्या पुड्या करायचे अन् व्यापाऱ्यांना हा अमुक देवाचा प्रसाद माझ्या मित्राने आणलाय, असे सांगून द्यायचे. समोरच्याने तो खाल्ला की, त्याचे ते काडेचिराईतागत झालेले तोंड बघून मनोमन हसायचे! कोणीही त्यांना परिचित भेटला की, त्याला विचारायचे, ‘बरा आहे ना मी?’ तो हो म्हणाला की, नाना म्हणत, ‘तुम्हाला काय माहीत मी बरा आहे ते?’
एकदा मे महिन्यात नाना त्या रखरखत्या वैशाख वणव्यात फक्त बर्मुडा घालून बसले होते. तेव्हढ्यात एक कुडमुड्या ज्योतिषी दुकानात आला. नानांचा अशा ज्योतिषांवर बिलकूल विश्वास नव्हता; मात्र तो ज्योतिषी आल्या आल्या म्हणतो कसा,‘शेठ, तुम्हाला चार मुले आहेत. तीन मुलगे अन् एक मुलगी.’ नाना म्हणतात, बरं मग? तो पुढे सरसावला. त्याचा समज झाला की, सावज कब्जात आलंय. तर तो पुढे म्हणाला की, तुमचा हात दाखवा त्यावरून पुढचे भविष्य सांगतो. नानांनी हात पुढे केला. ज्योतिषाने अगदी बारकाईने हात पाहून आणखी खूप काही चांगलंचुंगलं सांगितलं. तसे नाना म्हणाले, हे भविष्य तुम्ही कशाच्या आधारे सांगितलेत? तर तो कुडमुड्या म्हणाला की, पहिले तुमच्या चेहऱ्यावरून सांगितले अन् दुसरे तुमच्या हातावरील रेषा बघून सांगितले. आम्हा पोरांवर निरतिशय प्रेम करणारे, आमच्याशी मित्रासारखे वागणारे नाना आम्हाला सोडून लवकर गेले.
नाना उत्तम कॅरमपटू होते. आम्हा पोरांच्यात ते क्रिकेटही खेळायचे. ते सहसा चिडत नसत; मात्र एकदा त्यांच्या मुलाने शेजाऱ्याचे पोफळीचे रोप तोडले तेव्हा शेजारच्या नातेवाइकांनी चिडून नानांच्या मुलाला मारले. हा अपमान सहन न झाल्याने नानांनी त्या व्यक्तीला बोलावून त्याच्यासमोर स्वत:च्या बागेतील दहा-बारा पोफळीची रोपे कोयतीने साकटली. आमच्या वडिलांची म्हातारी मावशी आमच्या इथेच राहायची, तिची नाना रोजच फिरकी घ्यायचे. तिला विचारायचे, मावशी मला गाववाल्यांना फिस्ट द्यायचेय. त्यात मेनू काय बरे करावा? तेव्हा मावशी म्हणायची, करा मोदक नाहीतर भाजणीचे वडे किंवा पुरणपोळी. मग नाना म्हणणार, मावशे पुरणपोळ्याच करू. शंभर लोकांना पुरतील, अशा पुरणपोळ्यांना काय काय नी किती किती जिन्नस लागेल? मावशी प्रामाणिकपणे यादी सांगायची अन् म्हणायची. बघा हो आता यादी दिलेय. खर्चाकडून कसे परवडते तुम्हाला ते तुम्ही बघा. यावर नाना म्हणायचे, अहो त्यात काय एव्हढे ऐंशी तिथे पंच्याऐंशी कर पुरणपोळ्या!


(लेखक ग्रामीण जीवनातील बारकावे नोंदणारा आहे.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.