आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान या संघात होत आहे. अंतिम फेरीसाठी दोन्ही संघांना विजय खूपच महत्त्वाचा आहे. कारण पुढे जाऊन गणित आणखी किचकट होऊ शकतं. त्यामुळे या सामन्यात कोणतीही उणीव राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. यासाठी भक्कम प्लेइंग 11 वर भर असणार आहे. साखळी फेरीत ओमानविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी केली होती. या सामन्यात हिरो ठरलेला संजू सॅमसन 12वा खेळाडू होऊ शकतो. तुम्ही वाचलं ते अगदी बरोबर आहे. पण भारताच्या प्लेइंग 11 बाबत नाही. कारण संजू सॅमसन प्लेइंग 11 चा भाग असेल यात काही शंका नाही. 12 वा खेळाडू म्हणजेच टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 हजाराहून अधिक धावा करण्याऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. आतापर्यंत या यादीत 11 खेळाडू आहे. आता संजू सॅमसन या यादीत बसणारा 12वा खेळाडू ठरणार आहे.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माचं नाव आघाडीवर आहे. त्याने 4231 धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसर्या क्रमांकावर विराट कोहली असून त्याने 4188 धावा केल्या आहेत. आता या दोन्ही खेळाडूंनी टी20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांवर असून त्याने 2652 धावा केल्या आहेत. केएल राहुलने 2265 धावा, हार्दिक पांड्याने 1813, शिखर धवनने 1759, एमएस धोनीने 1617, सुरेश रैनाने 1605 धावा, ऋषभ पंतने 1209 धावा, युवराज सिंगने 1177 धावा, तर श्रेयस अय्यरने 1104 धावा केल्या आहे.
संजू सॅमसन या यादीत सहभागी होणारा 12 खेळाडू असणार आहे. यासाठी त्याला 83 धावांची गरज आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 83 धावा केल्या तर तो या यादीत सहभागी होईल. संजू सॅमसनने आतापर्यंत 45 टी20 सामने खेळले असून 39 डावात 917 धावा केल्या आहेत. त्यामुळे संजू सॅमसनकडे 1 हजार धावा पूर्ण करण्याची मोठी संधी आहे. पण शक्य झालं नाही तर आशिया कप स्पर्धेत तशी संधी आहे. कारण सुपर 4 फेरीत भारतीय संघ एकूण 3 सामने खेळणार आहे. त्यानंतर अंतिम फेरीत स्थान पक्कं झालं तर आणखी एक सामना वाटेला येईल.