पौड, ता. २० : कोकणात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मुळशी तालुक्यातील भूगाव येथील बहुचर्चित बाह्यवळण रस्त्याच्या कामाच्या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. पुढील नऊ महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) दिले आहेत.
भूगाव येथील वाहतूक कोंडीबाबत विविध प्रवाशांसह लोकप्रतिनिधींकडून ओरड होत होती. दरम्यान गडकरी यांनी आपल्या पुणे दौऱ्यात एनएचएआयच्या अधिकाऱ्यांसमवेत याबाबत बैठक घेतली. ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर या कामाबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
हे काम नऊ महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे एनएचआयचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.