आशिया कप 2025 स्पर्धेत सुपर 4 फेरीतील दुसऱ्या आणि एकूण 14 व्या सामन्यात पाकिस्तानने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये टीम इंडियासमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्तानने टीम इंडियाच्या मेहरबानीमुळे 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. अभिषेक शर्मा, कुलदीप यादव आणि शुबमन गिल या तिघांनी कॅच सोडल्या. पाकिस्तानने या संधीचा फायदा घेतला. भारताने केलेल्या अशा गचाळ फिल्डिंगमुळे पाकिस्तानला 171 धावा करता आल्या. आता टीम इंडिया हे आव्हान पूर्ण करत विजयी चौकार लगावणार की पाकिस्तान साखळी फेरीतील पराभवाची परतफेड करणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
टीम इंडियाच्या 3 खेळाडूंनी एकूण 4 कॅचेस सोडल्या. या 4 पैकी 3 कॅचेस शक्य आणि सोप्या होत्या. मात्र त्यानंतरही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या फलंदाजांना जीवनदान दिलं. भारताने पहिल्याच ओव्हरमध्ये साहिबजादा फरहान याला जीवनदान दिलं. हार्दिक पंड्या याने सामन्यातील तिसऱ्याच बॉलवर साहिबजादा फरहान याला जाळ्यात अडकवलं होतं. मात्र अभिषेक शर्मा याने सोपा कॅच सोडला. त्यामुळे साहिबजादाला शून्यवर असताना जीवनदान मिळालं.
अभिषेकने दिलेल्या जीवनदानाचा साहिबजादाने चांगलाच फायदा घेतला. त्यानंतरही अभिषेकने पुन्हा आठव्या ओव्हरमधील तिसर्या बॉलवर साहिबजादाला जीवनदान दिलं. अभिषेक सीमारेषेजवळ असता तर कॅच घेता आली असती. मात्र अभिषेक थोडा पुढे होता. त्यामुळे साहिबजादाला पुन्हा जीवनदान मिळालं. साहिबजादाने याचा फायदा घेतला. साहिबजादाने पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा केल्या. साहिबजादाने 45 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 5 फोरसह 58 रन्स केल्या. अभिषेक व्यतिरिक्त कुलदीप यादव याने सॅम अयुब तर शुबमन गिल याने फहीम अश्रफ याला जीवनदान दिलं. मात्र त्यानंतरही भारताने जोरदार कमबॅक केलं आणि पाकिस्तानला मोठी धावसंख्या करण्यापासून यशस्वीरित्या रोखलं.