आशिाय कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. या सामन्यात विजयी संघाला अंतिम फेरीच्या दिशेने कूच संधी मिळेल. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशील असतील. पण पहिल्या सामन्यातील भारतीय संघाची कामगिरी पाहता भारताचं पारडं जड आहे. तर भारताला हरवणं पाकिस्तानला खूपच कठीण असल्याचं दिसत आहे. माजी क्रिकेटपटूने पाकिस्तानच्या फलंदाजांची पोलखोल केली आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ भारतीय संघाला पराभूत करेल का? असा प्रश्न अधोरेखित होत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू यासिर हमीद याने ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यांनी केलेली पोस्ट पाहून क्रीडाप्रेमी आवाक् झाले आहेत. पाकिस्तानचा कोणता खेळाडू सर्वाधिक डॉट चेंडू खेळतो याची आकडेवारी आहे. या यादीत कर्णधार सलमान आघा सर्वात आघाडीवर आहे.
टी20 क्रिकेटमध्ये फलंदाजांचा स्ट्राईक रेट खूपच महत्त्वाचा असतो. पण पाकिस्तानी खेळाडू स्ट्राईक रेट वाढवण्याऐवजी स्ट्राईक रोटेशनवर भर देत असल्याचं दिसत आहे. पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज सैम अयुब आतापर्यंत 47.8 टक्के निर्धाव चेंडू खेळला आहे. साहिबजादा फरहान 54.2 टक्के, कर्णधार सलमान आघा 60.7 टक्के, मोहम्मद नवाज 52.1 टक्के, फहीम अशरफ 50.8 टक्के, हुसैन तलत 62.6 टक्के, फखर जमान 45.3 टक्के, मोहम्मद हारिश 43.9 टक्के, हसन नवाज 38.4 टक्के निर्धाव चेंडू खेळला आहे. पाकिस्तानच्या दहा खेळाडूंची आकडेवारी पाहता त्यांच्या चाहत्यांनी डोक्यावर हात मारला आहे.
आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ साखळी फेरीत तीन सामने खेळला आहे. युएई आणि ओमानला पराभूत करत सुपर 4 फेरीत जागा मिळवली. पण हे दोन्ही संघ पाकिस्तानच्या तुलनेत दुबळे गणले जातात. पण भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानला खेळणं खूपच कठीण गेलं. पाकिस्तानने साखळी फेरीत भारताविरूद्धच्या सामन्यात पहिल्या 10 षटकात 37 चेंडू निर्धाव घालवले. म्हणजेच सहा षटक अशीच गेली. त्यामुळे सामन्यात परतणं कठीण गेलं. या सामन्यात पाकिस्तानने 7 गडी गमावले होते. आता या रणनितीसह सुपर 4 फेरीत जिकणं कठीण मानलं जात आहे.