Truck Accident: जळगाव महामार्गावरील चौका घाटात ट्रक उलटला; चौका घाटातील वळण रस्ता बनला धोकादायक..!
esakal September 22, 2025 03:45 AM

फुलंब्री : छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील चौका घाटातील वळण रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून सातत्याने अपघाताचे सत्र या भागात सुरू आहे. मकाचे पोते घेऊन जाणारा ट्रक धोकादायक वळणावर शनिवारी (ता.२०) उलटल्याची घटना घडली आहे.

सुदैवाने चालक व क्लिनर यांना जीवितहानी झाली नाही; मात्र ट्रकमधील मका रस्त्यावर पडल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. जळगाव महामार्गावरील चौका घाटातील वळण रस्ता वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे.

गेल्या वर्षभरापासून या घाटात सतत अपघात घडत असून, नागरिक व वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. छत्रपती संभाजी नगर ते जळगाव हा राष्ट्रीय महामार्गाचे काम नव्याने करण्यात आले आहे. मात्र या महामार्गावरील वळण अधिकाऱ्यांना काढता आले नाही. त्यामुळे हा वळण रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे.

चौका घाटातील वळण अत्यंत तीव्र असल्यामुळे विशेषतः मोठ्या वाहनांचे नियंत्रण सुटते आणि अपघात घडतात. येथे वेग मर्यादा दर्शविणारे बोर्ड, गार्डरेल्स, दिशादर्शक चिन्हे यांचा पूर्णपणे अभाव आहे. त्यामुळे अनेकदा वाहनं घसरून किंवा पलटी होऊन मोठे अपघात होतात. मका घेऊन जाणारा ट्रक शनिवारी या वळण रस्त्यावर पलटी झाला आहे. या अपघातानंतर स्थानिक पोलीस व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. काही काळ वाहने रांगेत उभी राहिल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दिशादर्शक व सुरक्षाव्यवस्था असणाऱ्या फलकाची गरज निर्माण झाली आहे.

Ganesh Visarjan 2025 : मानाच्या गणपतींचे आठ तासांत विसर्जन, शिस्तबद्ध मिरवणुकीमुळे दीड तास लवकर; लाखो भाविकांच्या उपस्थितीत जल्लोष वाहनाच्या वेग मर्यादाचा फलक आवश्यक

छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील चौका घाटात वेगमर्यादा फलक, सिग्नल दिवे, गार्डरेल्स, वाहनाची वेग मर्यादा असणारा फलक, वेग नियंत्रक कटाव (रंबल स्ट्रिप्स) व रात्रीच्या वेळी परावर्तक रंगाचे बोर्ड लावावेत. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.