नवदेवींच्या दर्शनासाठी महिलांची लगबग
esakal September 22, 2025 03:45 AM

पालघर, ता. २१ (बातमीदार) : घटस्थापनेपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत आहे. या उत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी बहुसंख्य महिला बाहेर पडतात. देवीच्या आगमनाची जय्यत तयारी झाली आहे. पालघर तालुक्यातील देवींच्या देवस्थान मंडळांनी भाविकांच्या दर्शनासाठी तयारी केलली आहे. उद्या (ता. २२) पहिल्या दिवशी पहिली माळ देवीच्या देवळामध्ये चढणार आहे. अशा नऊ माळी चढून दसऱ्याच्या दिवशी या उत्सवाची सांगता होणार आहे.

पालघर तालुक्यात केळव्याची शितलादेवी, कालिकादेवी, माकुणसारची एकविरा माता, सफाळ्याची कुर्ला देवी, तांदुळवाडीची वज्रेश्वरी, पालघरची आंबे माता, शिरगावची खामजाई देवी, माहीम वडराईची कालिकादेवी व महिकावती देवी या नऊ देवींच्या दर्शनासाठी महिलांची मोठी गर्दी होते. याव्यतिरिक्तही पालघर तालुक्यात एडवण येथील आशापुरी माता, केळवे रोडची आंबे माता, शिरगावची सप्तशृंगी देवी, उमरोळी येथील कालिका माता व नाचणदेवी, तारापूरची पांगळा देवी, हालोलीची अंबे माता, पालघरची संतोषी माता, माहीमची चतुर्शिंगी देवी, दापोलीची रेणुका माता ही देवस्थाने आहेत. येथेही काही महिलाभक्त दर्शनासाठी जात असतात. येथेही देवस्थान ट्रस्टने जयत तयारी केली आहे.

निवडणुकीची झलक
विशेष म्हणजे पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षाच्या नवरात्रीत पालघर तालुक्यात राजकीय रंग चढलेला दिसत आहे. रस्त्याला मोठमोठ्या कमानी उभारलेले आहेत. इच्छुक उमेदवारांचे फोटो झळकलेले आहेत. विविध राजकीय पक्षांनी मोठा गरबा आणि दांडिया रासचे आयोजन केले आहे. त्यामुळे या वर्षाच्या गरबा नृत्याला राजकीय स्वरूप आलेले आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी आर्थिक फार मोठा उचललेला दिसत आहे.

वॉटरप्रूफ मंडपांची चलती
पालघरमध्ये या नवरात्रीत गरबाचा फेर धरण्यासाठी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था केली आहे, कारण तालुक्यात सतत पावसाच्या धारा सुरूच आहेत. या उत्सवात कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून नवरात्र मंडळांनी गरबा नृत्यासाठी खास वॉटरप्रूफ मंडप उभारले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.