प्रगती महाविद्यालयात ‘प्राईड द ऑनर’ साजरा
आंतर महाविद्यालयीन स्पर्धांत २९ महाविद्यालयांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ ः आगरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रगती महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतर महाविद्यालयीन प्राईड द ऑनर साजरा झाला. प्राईड द ऑनर या बॅनरखाली मल्टी-स्किल आयडेंटिफायर स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. कल्याण-डोंबिवलीमधील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांत सहभाग घेत आपले कलाकौशल्य दाखविले.
प्राईड सेल्फ फायनान्सिंग कोर्सेस विभागातर्फे या स्पर्धांचे आयोजन नुकतेच प्रगती महाविद्यालयात केले होते. प्रभारी प्राचार्य डॉ. धनंजय वानखेडे यांनी प्रमुख अतिथी डॉ. किशोरी भगत आणि इतर सर्व मान्यवरांचे स्वागत केले. उपप्राचार्य डॉ. कीर्ती बराड, प्रा. स्नेहा म्हात्रे यांचेही या वेळी स्वागत करण्यात आले. या महोत्सवात २९ महाविद्यालयांतील तब्बल ४९३ विद्यार्थ्यांनी आपला उत्साही सहभाग नोंदवला. यात आपल्या अंगीभूत कौशल्याची चुणूक दाखवत अनेक स्पर्धकांनी विजय मिळवून आपल्या महाविद्यालयाचा गौरव वाढवला.
कार्यक्रमासाठी समाजातील नामांकित संस्था करिअर स्कील अकॅडमी, इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अकाउंट डोंबिवली, स्टर्लिंग इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नेरूळ इंटरनॅशनल बिझनेस स्कूल, ब्राईट वेज, गणेश क्लॉथ (कल्याण) यांच्याकडून स्पॉन्सरशिप मिळाली. महाविद्यालयाचे व्यवस्थापन, बँकिंग व इन्शुरन्स समन्वयक प्रा. स्वाती पुसाळकर आणि बी.एस.सी. आय.टी. समन्वयक प्रा. रूपाली पाटील आणि सहभागी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने प्राईड द ऑनरसारखा वैविध्यपूर्ण कार्यक्रम यशस्वी झाला.
टेक्निकल गेम्सचा समावेश
सांघिक स्पर्धेच्या माध्यमातून टीम स्पिरीट, सहकार्य आणि नेतृत्व गुणांचा विकास साधणे, खेळ संस्कृतीला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांमधील अंगीभूत कलागुणांना वाव देणे, हे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्राईड द ऑनरमध्ये बेग बोरो अँड स्टिल, ॲड मेकिंग, ब्लाइंड फोल्ड, फ्लायर फिस्टा, फ्री फायर यांसारखे वेगवेगळे मॅनेजमेंट आणि टेक्निकल गेम्स समाविष्ट केले होते.