Car Look: स्क्रॅचेसमुळे कारचा लूक खराब झालाय? 'या' सोप्या घरगुती टिप्स वापरा, कार दिसेल चकाचक
Tv9 Marathi September 22, 2025 02:45 AM

कार खरेदी केल्यावर ती कायम चमकत रहावी असे प्रत्येक कारमालकाचं स्वप्न असतं. मात्र बऱ्याचदा छोट्या चुकांमुळे पार्किंगमध्ये कारला स्क्रॅचेस पडतात, यामुळे कारचा लूक खराब होतो. हे स्क्रॅचेस काढण्यासाठी कार वॉश किंवा वर्कशॉपमध्ये जावे लागते, यासाठी हजारो रुपयांचा खर्च येतो. मात्र आम्ही तुम्हाला आज अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी हे स्क्रॅचेस दुरुस्त करु शकता. यामुळे तुमचा हजारो रूपयांचा खर्च वाचू शकतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सँडपेपर

कारवरील स्क्रॅचेस काढण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सँडपेपर. सर्वप्रथम सँडपेपर 10 ते 15 पाण्यात भिजायला ठेवा. यानंतर जिथे स्क्रॅचेस पडले आहेत तिथे सँडपेपरने हलक्या हाताने घासा, जास्त दाब देऊ नका, अन्यथा कारचा रंग निघू शकतो. असे केल्याने कारवरील स्क्रॅचेस पूर्णपणे निघून जातात, यामुळे तुमचे हजारोंचे काम काही रूपयांमध्ये होऊ शकते. मात्र हा पर्याय फक्त हलक्या स्कॅचेससाठी वापरता येऊ शकतो.

रबिंग कंपाऊंडने पॉलिश करा

कारवरील स्क्रॅचेस खोल असतील तर ते रबिंग कंपाऊंडच्या मदतीने दूर होऊ शकतात. सर्वप्रथम स्क्रॅचेस मऊ कापडाने हळूवारपणे घासून घ्या. त्यानंतर मायक्रोफायबर कापडाने त्या भागाला पॉलिश करा. यामुळे गाडीची चमक परत येईल आणि स्क्रॅच लपतील. यामुळे तुमची कार पुन्हा नव्यासारखी चमकू शकते.

स्क्रॅच रिमूव्हर

बाजारात कारवर पडलेले स्क्रॅच काढण्यासाठी स्क्रॅच रिमूव्हर उपलब्ध आहेत. हे स्क्रॅच रिमूव्हर वापरण्यास सोपे असून ते जलद परिणाम देतात. स्क्रॅच रिमूव्हर स्क्रॅचवर थोडेसे लावा आणि कापडाने हळूवारपणे घासून घ्या. काही मिनिटांतच स्क्रॅच नाहीसे होतील आणि कार नवीन दिसेल.

महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
  • वरील सांगितलेल्या पद्धती फक्त लहान आणि हलक्या स्क्रॅचसाठी आहेत.
  • स्क्रॅच खोल असतील किंवा रंग पूर्णपणे झिजला असेल, तर वर्कशॉपला भेट देणे फायदेशीर ठरेल.
  • स्क्रॅच काढताना कारच्या पृष्ठभागाचे नुकसान टाळण्यासाठी मऊ, स्वच्छ, किंवा मायक्रोफायबर कापड वापरा, यामुळे रंगाची झीज होणार नाही.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.