पिंपरी, ता. २१ : बेकायदारित्या गांजा बाळगणाऱ्या व त्याची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडक मोहीम राबवली आहे. मागील काही दिवसांत या मोहिमेत पोलिसांनी १३८ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तब्बल ५९८ किलो गांजा जप्त केला आहे. ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. यासह मेफेड्रॉनप्रकरणी १९ जणांना अटक केली आहे.
शहरात बेकायदारित्या गांजा आणून त्याची विक्री केली जाते. सहजरित्या गांजा, अफू हे अमली पदार्थ उपलब्ध होतात. यामुळे अनेकजण व्यसनाच्या अधीन जातात. यामध्ये तरुण मुलांसह अल्पवयीन मुलांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे गांजासह इतरही अमली पदार्थांची शहरात होणारी विक्री व वाहतूक रोखण्यासाठी मागील काही दिवसांपासून पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. ठिकठिकाणी सापळे रचून आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे. मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे. मागील आठ महिन्यांत गांजा बाळगणाऱ्यांवर ११८ गुन्हे दाखल केले आहेत. तसेच मेफेड्रॉन, चरस, अफीम, अफू जप्तीच्याही कारवाया केल्या आहेत.
गंभीर गुन्हा
गांजा, चरस, मेफेड्रॉन, अफू, अशा अमली पदार्थांची बेकायदारित्या साठवणूक किंवा वाहतूक ही एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा आहे. या कायद्यानुसार दोषी आढळल्यास कठोर कारावासाची शिक्षा आणि आर्थिक दंडही होऊ शकतो.
पोलिसांकडून आवाहन
पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ‘असे कोणतेही बेकायदा प्रकार आपल्या परिसरात निदर्शनास आल्यास तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्याला माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.’
‘‘बेकायदारित्या अमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.
- संतोष पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक
जानेवारी-ऑगस्टमधील कारवाई
घटक दाखल गुन्हे वजन अटक
गांजा ११८ ५९८ किलो १३८
अफीम ४ १५ किलो ६
मेफेड्रोन १४ ३०२ ग्रॅम १९
---