चोरट्यांनी हिसकावला ६० हजारांचा मोबाईल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे : ठाणे शहरात वाहतूक कोंडी काही नवीन नाही. अशाच वाहतुकी कोंडीचा फायदा आता चोरटे घेत असल्याची घटना ठाण्यात समोर आली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी कोंडी हळूहळू धावणाऱ्या रिक्षामधील प्रवासी महिलेच्या हातातील आयफोन १४ हा ६० हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन हिसकावून धूम ठोकली आहे. याप्रकरणी त्या चोरट्यांविरोधात कळवा पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली येथे राहणाऱ्या तक्रारदार या ठाण्यातील एका नामांकित रुग्णालयात एचआर या पदावर कार्यरत आहेत. १६ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे त्या रुग्णालय येथून डोंबिवली येथे घरी जाण्यासाठी ऑनलाईन रिक्षा बुक केली. रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास रिक्षात बसून त्यांचा प्रवास सुरू झाला. रिक्षा कळवा येथील नायरा पेट्रोलपंप क्रॉस करून पुढे आल्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असल्याने रिक्षा हळूहळू पुढे जात असताना, साधारणपणे आठ वाजून ४० मिनिटांनी रिक्षाचा पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने खेचून पळ काढला. त्यावेळी त्या थेट घरी गेल्या. तसेच घडलेल्या घटनेने घाबरल्या होत्या. त्यातच दोन दिवस कामानिमित्त नातेवाईकाकडे गेल्याने तक्रार देण्यासाठी उशीर झाला. तो मोबाईल त्यांनी दोन वर्षांपूर्वी विकत घेतला होता असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात त्या मोबाईल चोरट्या दुकलीविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.