या वर्षीचं सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ रागासा फिलिपिन्समध्ये धडकलं आहे. फिलिपिन्समध्ये सध्या प्रति तास 270 किमी वेगानं वारं वाहत आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर धोकादायक क्षेत्रातील तब्बल दहा हजार लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. रागासा हे या वर्षीचं जगातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ आहे. फिलिपिन्ससह हाँगकाँग, तैवान आणि चीनला देखील या वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. तैवानने तातडीनं आपल्या सर्व विमान फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर हाँगकाँगमध्ये देखील पुढील 36 तास विमानांचं कुठलही उड्डाण होणार नाहीये.
रागासा हे या वर्षीचं जगातील सर्वात भयानक वादळ आहे. फिलिपिन्सच्या हवामान विभागाकडून रागासाच्या पार्श्वभूमीवर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे समुद्रात अतिप्रचंड लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे, तसेच अतिमुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाचा देखील धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे फिलिपिन्समध्ये सर्व सकारी ऑफिस बंद करण्यात आले असून, शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. फिलिपिन्समध्ये आधीच अतिमुसळधार पाऊस सुरू आहे, त्यातच आता हे चक्रीवादळ धडकल्यानं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
चीनमधील चार लाख लोकांच स्थलांतर
तर दुसरीकडे आता चीनला देखील या चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन चीनमधील तब्बल चार लाख लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे, त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. मंगळवारी या चक्रीवदळाची तीव्रता आणखी वाढणार असल्यानं चीनमधील झुहाई, जियांगमेन आणि शेनझेन या तीन प्रमुख शहरातील सर्व सोई सुविधा, सरकारी कार्यालय आणि शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
मोठं नुकसान होण्याची शक्यता
दरम्यान हे चक्रीवादळ प्रति तास 270 कीमी वेगानं मार्गक्रमण करत असून, मंगळवारी या चक्रीवादळाचा जोर आणखी वाढणार आहे, त्यामुळे चीन, फिलिपिन्स आणि तैवानमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.