Sahitya Sammelan 2025: शंभर वर्षांची परंपरा जपणारे साहित्य संमेलन, साताऱ्यात होणार ऐतिहासिक साहित्य उत्सव!
esakal September 22, 2025 10:45 PM

यंदा फार जुनी परंपरा असलेल्या दोन साहित्य संमेलनांचे बार एकाच महिन्यात पुढील वर्षांरंभात उडणार आहेत. शतकाच्या उंबरठ्यावरचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तर शंभर वर्षांची परंपरा असलेले मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन सायमन मार्टिन यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकला नऊ ते अकरा जानेवारीला होणार आहे.

दोन्ही साहित्य संमेलनांचे पडघम वाजायला सुरवात झाली आहे. `पानिपत'कार पाटील यांच्या अलिकडच्या आरक्षणाबाबतच्या एका विधानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवडीबद्दल साहजिकच संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. असल्या वादांमुळेच खरे तर मराठी साहित्य संमेलनांत रंगत आणि मजा येते असे म्हटले जाते.

माझ्या आठवणीप्रमाणे वादाची ही गौरवशाली परंपरा घोषित आणीबाणीपर्वात कराड येथे दुर्गाबाई भागवत यांच्या अध्यक्षतेखाली आणि मावळते अध्यक्ष पुरुषोत्तम लक्ष्मण तथा पुल देशपांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या 1975 सालच्या संमेलनापासून सुरु झाली आहे. असो.

तर मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेने आपल्या घटनेनुसार संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करुन, इच्छूक उमेदवारांकडून रितसर अर्ज मागवून, त्यांच्या मुलाखती वगैरे असे सर्व सोपस्कार पार पाडून संमेलनाध्यक्षांची निवड जाहीर केली आहे. बीड येथे झालेल्या सव्वीसाव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे आणि परिषदेचे विद्यमान अध्यक्ष पौलस वाघमारे यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.

वसईचे फादर विजय गोन्साल्विस अध्यक्षपदी असलेला नाशिक ख्रिस्ती साहित्य संघ नियोजित सत्ताविसाव्या संमेलनाचा यजमान आहे. किमान दहा पुस्तके आपल्या नावावर असलेल्या व्यक्तीच यंदा संमेलनाध्यक्ष पदासाठी पात्र होत्या. याचे कारण एकही साहित्यकृती नसलेले लोक यापूर्वी संमेलनाध्यक्ष झालेले आहेत. दुसऱ्या एका अलिखित संकेतानुसार यावेळचे साहित्य संमेलनाध्यक्षपद कॅथोलिक व्यक्तीसाठी राखीव होते. दोन वर्षानंतर होणाऱ्या संमेलनासाठी हे पद प्रोटेस्टंट साहित्यिकांसाठी राखीव असेल.

मार्टिन यांच्याव्यतिरिक्त यंदा दोन इतर साहित्यिक रिंगणात होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक हेमंत घोरपडे आणि वसई येथील आणि संध्या नागालँड येथे कार्यरत असलेले सालेशियन किंवा डॉन बॉस्को संस्थेचे फादर नेल्सन फलकाव यांनी या पदासाठी अर्ज दाखल केले होते.

निवड समितीने यापैकी मार्टिन आणि घोरपडे यांच्या मुलाखती घेतल्या, फादर फालकाव मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत येऊ न शकल्याने त्यांचा अर्ज बाद झाला होता. मराठी साहित्य परिषदेने फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि डॉ जयंत नारळीकर यांच्याबाबतीतला अनुभव लक्षात घेऊन आता धट्टाकट्टा, चालताबोलता आणि हिंडूफिरु शकणारा संमेलनाध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

मराठी ख्रिस्ती साहित्य परिषदेनेसुद्धा यावेळी असाच निकष घेतला असावा. ऐंशीच्या उंबरठ्यावरील घोरपडे यांना त्यांचे वय बहुधा प्रतिकूल ठरले. निवडणुकीचा आग्रह त्यांनी टाळल्याने राज्यातील पात्र मतदारांचा मात्र हिरमोड झाला असेल. मराठी खिस्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला एक वेगळेच वलय आहे.

सन १९२७ पासून नाशिक येथूनच सुरु झालेल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद याआधी `स्मृतीचित्रे'कार लक्ष्मीबाई टिळक (नागपूर १९३३), प्रा. जयंतकुमार त्रिभुवन (कोल्हापूर १९८६), फादर फ्रान्सिस दिब्रिटो (पुणे १९९२), डॉ. सिसिलिया कार्व्हालो (नाशिक २०००) आणि डॉ.अनुपमा निरंजन उजगरे (मुंबई २००५) यांनी भूषविले आहे.नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांचा आणि माझा परिचय अगदी अलिकडचा. काही महिन्यांपूर्वीचा.मात्र साहित्यविश्वातील त्यांच्या कामगिरीबाबत फार आधीपासून मला माहिती आहे. सायमन मार्टिन यांच्या निवडीमुळे नाशिकमधील नियोजित संमेलन मोठ्या उत्साहात होईल यात शंका नाही.

Marathi Sahitya Sammelan:'मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी विश्वास पाटील'; साताऱ्यात एक ते चार जानेवारीदरम्यान रंगणार साहित्यप्रेमींचा मेळा

ख्रिस्ती साहित्य संमेलनांतील माझा सहभाग तसा मर्यादित राहिला आहे. तिसेक वर्षांपूर्वी कवि निरंजन उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली मालवण येथे झालेल्या आणि अशोक आंग्रे यांच्या अध्यक्षतेखाली नगर येथे २०१२ साली झालेल्या संमेलनास मी एक श्रोता म्हणून हजर होतो. सातारा आणि नाशिक या दोन्ही साहित्य संमेलनांशी निगडीत असलेल्या बातम्या आणि घडामोडींकडे एक साहित्यप्रेमी म्हणून इतरांप्रमाणे माझेही लक्ष असणार आहे. नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.