Israel And Hamas War : सध्या मध्य पूर्व आशिया जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्रायलकडून गाझा शहरावर जोरदार हल्ले केले जात आहेत. असे असतानाच ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाने पॅलेस्टाईनला एक राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. तशी अधिकृत घोषणाच करण्यात आली आहे. तिन्ही देशांच्या या घोषणेमुळे आता इस्रायलने आणखी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी काहीही झालं तरी पॅलेस्टाईन राष्ट्राची स्थापना होणार नाही, असं थेट सांगून टाकलं आहे.
ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या तीन देशांनी पॅलेस्टाईन देशाला मान्यता दिल्यानंतर इस्रायलचे पंतपधान बेंजामीन नेतान्याहू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पॅलेस्टाईनला मान्यता देणं म्हणजे हमासला एक प्रकारे पारितोषिक देण्यासारखंच आहे. आम्ही असं होऊ देणार नाही. जॉर्डन नदीच्या पश्चिमेला पॅलेस्टाईन राष्ट्राची स्थापना होणार नाही, असं नेतान्याहू यांनी ठणकावून सांगितले आहे.
तीन देशांनी पॅलेस्टाईनला नवे राष्ट्र म्हणून मान्यता दिल्यानंतर आता इस्रायलने आंतरराष्ट्रीय पातळीवर हालचाली चुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता नेतान्याहू लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या या दौऱ्यात ते व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. ही यात्रा झाल्यानंतरच आम्ही इस्रायलची पुढची रणनीती जाहीर करू, असे नेतान्याहू यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता अमेरिकेच्या दौऱ्यानंतर नेतान्याहू नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
आतापर्यंत अनेक देशांनी पॅलेस्टाईनला एक देश म्हणून मान्यता दिलेली आहे. अल जजिराने दिलेल्या एका रिपोर्टनुसार जगातील कमीत कमी 146 देश पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देतात. भारताने 1988 सालीच पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली आहे. जी-7 देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन या देशांनीही पॅलेस्टाईन हे राष्ट्र असल्याचे मान्य केले आहे. असे असताना आणखी तीन देशांनी पॅलेस्टाईनची राष्ट्र म्हणून घोषणा केली आहे. त्यामुळे इस्रायल भविष्यात नेमके काय करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.