मला काही फरक पडत नाही…! साहिबजादा फरहानने दहशतवादी सेलिब्रेशनचं असं केलं समर्थन, म्हणाला…
GH News September 22, 2025 09:16 PM

आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीत भारत पाकिस्तान सामना पार पडला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून धुव्वा उडवला. या सामन्यातील पाकिस्तानच्या डावात तसं पाहीलं तर त्यांची हवा तयार झाली होती. कारण भारताच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे त्यांना फायदा झाला होता. त्यामुळे 171 धावांपर्यंत मजल मारता आली होती. साहिबजादा फरहानचे दोन झेल सुटल्याने त्याला अर्धशतकी खेळी करता आली. पण अर्धशतकानंतर त्याचं सेलीब्रेशन वादाचं कारण ठरलं. त्याच्या सेलिब्रेशननंतर पाकिस्तानची जनता आणि खेळाडूंमध्ये दहशतवाद किती भिनला आहे हे दिसून येतं. खरं तर त्यांचा डीएनएच दहशतवादाचा असल्याचं बोललं जात आहे. साहिबजादा फराहनने अर्धशतक ठोकल्यानंतर बॅट एके 47 सारखी पकडली. अगदी दहशतवादी खांद्यावर ठेवून हवेत गोळीबार करतात तसंच.. त्यानंतर गोळीबाराची एक्शन करून सेलीब्रेशन केलं. त्याच्या या सेलिब्रेशननंतर भारतीय चाहते आणि राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला. पण याचं फरहानला काहीच दु:ख नसल्याचं वक्तव्यातून स्पष्ट होते.

श्रीलंकेविरुद्धच्या आगामी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत फरहानने या वादावर प्रतिक्रिया दिली. ‘मी माझा खेळ योग्यरित्या खेळतो. त्यावेळी मला आनंद साजरा करावासा वाटत होता. म्हणूनच मी ते केले. इतर लोक याबद्दल काय विचार करतात याची मला पर्वा नाही. माझ्या मते, कोणत्याही संघाविरुद्ध असे खेळणे महत्त्वाचे आहे.’ असं फरहान तोंड वर करून म्हणाला. यातून त्याला काहीच पश्चाताप नसल्याचं स्पष्ट झालं. ‘मी अर्धशतक साजरे करत नाही. अचानक माझ्या मनात ते आले आणि मी ते केले. मला माहित नाही की लोक ते कसे घेतील आणि मला त्याचा काही फरक पडत नाही.’, असंही तो पुढे म्हणाला.

साहिबजादाला दोन जीवदान मिळाले म्हणून अर्धशतकी खेळीपर्यंत मजल मारता आली. खरं तर त्याचं अर्धशतक पण फुसका बारच निघालं. त्याने 128 च्या स्ट्राईक रेटने तीन षटकार आणि पाच चौकार मारून 58 धावा केल्या. पण मधल्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे पाकिस्तानला 200 धावा गाठता आल्या नाही. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 6 गडी आणि 7 चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केलं. दरम्यान, साहिबजादा फरहान सेलीब्रेशन आणि वादग्रस्त वक्तव्यावर आयसीसी काय कारवाई करेल हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.