आशिया कप 2025 स्पर्धेत अंतिम फेरीसाठी आता 4 संघात चुरस पाहायला मिळत आहे. साखळीनंतर 20 सप्टेंबरपासून सुपर 4 फेरीला सुरुवात झाली. टीम इंडिया आणि पाकिस्तानने ए ग्रुपमधून सुपर 4 मध्ये प्रवेश केला. तर बांगलादेश आणि श्रीलंकेने बी ग्रुपमधून धडक दिली. सुपर 4 फेरीत दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना खेळला आहे. बांगलादेशने 20 सप्टेंबरला श्रीलंकेला पराभूत करत सुपर 4 मध्ये विजयी सलामी दिली. त्यानंतर टीम इंडियाने रविवारी 21 सप्टेंबरला शेजारी पाकिस्तानला लोळवलं.
भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला. भारताने 172 धावांचं आव्हान हे 7 बॉलआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. भारताने पाकिस्तानला पराभूत करत आशिया कप 2025 स्पर्धेतील सलग चौथा विजय मिळवला. भारताने पाकिस्तानला सुपर 4 आधी साखळी फेरीतही लोळवलं होतं.
पाकिस्तानचा पत्ता कट होणार?भारताने या विजयासह अंतिम फेरीच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं आहे. तर या पराभवामुळे पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे. या पराभवामुळे आता पाकिस्तानवर सुपर 4 मधून बाहेर होण्याची टांगती तलवार आहे. पाकिस्तानला सुपर 4 मधून अंतिम फेरीत पोहचण्यासाठी उर्वरित 2 सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. पाकिस्तानची कामगिरी पाहता सलग दोन्ही सामने जिंकणं त्यांना जमेल असं वाटत तरी नाही. मात्र क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही.
पाकिस्तानसमोर सुपर 4 मध्ये कुणाचं आव्हान?पाकिस्तानला सुपर 4 मध्ये टीम इंडियानंतर श्रीलंका आणि बांगलादेश विरुद्ध खेळायचं आहे. श्रीलंकेला सुपर 4 मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशकडून पराभूत व्हावं लागलं. अर्थात पाकिस्तान आणि श्रीलंकेची स्थिती सारखीच आहे. सुपर 4 मधील तिसऱ्या सामन्यात हे 2 पराभूत संघ आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा करो या मरो असला सामना असणार आहे. विजयी संघाचं आव्हान कायम राहिल. तर पराभूत संघाला मायदेशी परतावं लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तान हा सामना जिंकणार की श्रीलंका विजयी ट्रॅकवर परतणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
पाकिस्तानसाठी फायनलचं समीकरणश्रीलंकेचा 23 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध पराभव झाल्यास आव्हान संपुष्टात येईल. त्यानंतर पाकिस्तानसमोर रविवारी 25 सप्टेंबरला बांगलादेशचं आव्हान असणार आहे. मात्र पाकिस्तानला फायनलमध्ये पोहचायचं असेल तर जिंकून चालणार नाही. पाकिस्तानला नेट रनरेटच्या हिशोबाने बांगलादेश विरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. त्यामुळे पाकिस्तानचा उर्वरित 2 सामन्यांमध्ये चांगलाच कस लागणार आहे.