ऊर्से, ता. २२ ः श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त २२ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान मावळ तालुक्यातील साठपेक्षा अधिक गावांमध्ये श्री दुर्गामाता दौड आयोजित करण्यात आली आहे.
ही परंपरा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी सुरू केली. त्यांच्या मते, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यापूर्वी जिजामातांनी नवरात्रात देवीची आराधना करून देशासाठी रक्षणाची प्रार्थना केली होती. त्यातूनच शिवछत्रपती जन्माला आले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.
आजही देशासमोर अनेक अडचणी आणि आव्हाने आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी आणि तरुणांमध्ये देशभक्ती, नशामुक्त जीवनशैली आणि शिवशाही विचार रुजवण्यासाठी दुर्गामाता दौड काढली जाते. दौडीत दररोज सकाळी गावातील शिवभक्त पारंपरिक पोशाख घालून, भगवा झेंडा घेऊन, देवीच्या मंदिराजवळ एकत्र येतात आणि नंतर पायाने संपूर्ण गावातून दुर्गामाता दौड काढतात. या वर्षी मावळ तालुक्यात साठहून अधिक गावांमध्ये ही दौड उत्साहात पार पडत आहे.
(फोटो क्रमांक: BBD25B03433)