Motivational Story: 'नितीन बावळेचा हात तुटला, क्रिकेटचा नाद नाही सुटला'; जिद्दी अन् कष्टाच्या जाेरावर खेळाडूचे 'सोने'; राष्ट्रीय संघात झेप
esakal September 24, 2025 04:45 AM

-सतीश वैजापूरकर

शिर्डी : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील नितीन बावळे यांनी शालेय जीवनात क्रिकेट स्पर्धा गाजविल्या. त्यांच्या मध्यम गती गोलंदाजीने अनेकदा प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवून दिली. क्रिकेटमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने कसून सराव सुरू होता; मात्र अपघातात एक हात गमवावा लागला. सर्व काही संपले असे वाटत असताना, त्यांनी नव्याने भरारी घेतली.

योगायोगाने त्यांना क्रिकेट प्रशिक्षक नितीन बाराहाते यांचे मार्गदर्शन मिळाले. जिद्द अन् मेहनतीच्या जोरावर वाबळे यांनी यश खेचून आणले. त्यांची राष्ट्रीय पातळीवर दिव्यांग भारतीय ‘अ’ संघात निवड झाली. एका अर्थाने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले.

सध्या हैदराबाद येथे राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडीयममध्ये सुरू असलेल्या राजीव गांधी चॅलेंजर सिरीज क्रिकेट स्पर्धेत ते आपल्या मध्यम गती गोलंदाजीची कमाल दाखवीत आहेत. हुशार विद्यार्थी अन् उत्तम गोलंदाज अशी ओळख असलेले नितीन वाबळे मुळचे कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील रहिवासी. बॅंकेची परीक्षा उत्तीर्ण झाले. ते सध्या ते वारी कान्हेगाव येथील बडोदा बँकेमध्ये कार्यरत आहेत.

अपघातात एक हात गमवावा लागल्याने क्रिकेटचे कसे होणार ही भावना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. बॅंकेत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. मात्र, क्रिकेटचे वेड आणि त्यात करिअर करण्याचे स्वप्न काही केल्या डोळ्यापासून दूर होत नव्हते. त्यांचे सहकारी बॅंक कर्मचारी मंगेश जपे यांनी योगायोगाने त्यांची भेट सावळिविहीर येथील सोमय्या क्रिकेट अॅकॅडमीतील प्रशिक्षक नितीन बारहाते यांच्याशी भेट घालून दिली. त्यांचे क्रिकेटचे वेड बघून बारहाते यांनी त्यांना सोमय्या क्रिकेट अॅकॅडमीत धडे देण्यास सुरवात केली. सोमय्या विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक मारुती धायतडक यांचे सहकार्य मिळाले. अर्धवट राहिलेला क्रिकेटचा प्रवास पुन्हा सुरू झाला. प्रशिक्षक बारहाते सध्या मुंबईला असतात; परंतु वाबळे यांची जिद्द लक्षात घेता ते शिर्डीला येतात. त्यावेळी ते त्यांना विनामूल्य प्रशिक्षण देतात. त्यातून वाबळे यांनी दिव्यांग क्रिकेट खेळाडूंच्या विश्वात वेगळे स्थान निर्माण केले. आता, त्यांना राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळाले.

नवोदित खेळाडूंनी नितीन वाबळे यांच्याकडून एक प्रेरणा घ्यायला हवी. फक्त टॅलेंट असून उपयोग नाही, तर त्याला मेहनतीची जोड अन् अन्य सुख- सुविधांचा त्याग करण्याची तयारी असेल, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळविता येते हे त्यांनी सिद्ध करून दाखविले.

- नितीन बाराहाते, क्रिकेट प्रशिक्षक, सोमय्या क्रिकेट अॅकॅडमी, सावळिविहीर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.