एकही मंत्री बांधावर फिरकला नाही, ठाकरेंची टीका; फडणवीस म्हणतात,'हे हास्यास्पद'
esakal September 24, 2025 05:45 AM

राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलंय. मराठवाड्यात जे जिल्हे दुष्काळी म्हणून ओळखले जातात त्याच जिल्हात अतिवृष्टी झालीय. पावसाने हाहाकार उडाला असून मदतीसाठी एनडीआरएफ, एसडीआरएफसह लष्कराला बोलवावं लागलं आहे. मराठवाड्यात पावसानं हाहाकार उडाला आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलीय. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेत उद्धव ठाकरे यांनी मंत्री बांधावर फिरकले नाहीत, मराठवाड्याला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला होता. या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हास्यास्पद म्हटलं जातंय. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उत्तर दिलं.

उद्धव ठाकरे म्हणाले होते की, काही मंत्री बांधावर फिरकलेले नाहीत. मराठवाड्याला सापत्न वागणूक दिली जात आहे. साधं हेलिकॉप्टरनेसुद्धा पूर परिस्थितीची पाहणी करायला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती.

अतिवृष्टीने बळीराजा संकटात, मंत्र्यांना बांधावर जाण्याच्या सूचना; CM फडणवीसांनी ओल्या दुष्काळाचा विषय मात्र टाळला

मुख्यमंत्र्यांनी आजची मंत्रिमंडळ बैठक रद्द करायला पाहिजे होती. पूर्णपणे मराठवाड्यातल्या अतिवृष्टी संदर्भात आढावा घ्यायला पाहिजे होता. केंद्राने किमान तातडीने दहा हजार कोटींची मदत जाहीर करायला पाहिजे अशी मागणीही ठाकरेंनी केली होती.

उद्धव ठाकरे यांच्या मागणीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मला राजकारण करायचं नाही, पण उद्धवजींनी अशी मागणी करणं हास्यास्पद आहे. जेव्हा त्यांच्या काळात असं घडलं होतं तेव्हा लाल कार्पेटवर काय झालं त्यात मला जायचं नाही. त्यांनी राजकारण करू नये.

लोकांना संकटाच्या काळात राजकारण अपेक्षित नसतं. सगळ्यांनी मिळून लोकांना मदत केली पाहिजे. दुर्दैवाने राज्यात काही पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं असतं. पण आम्ही राजकारण करणार नाही. जी काही मदत करायची आहे ती करेन असंही फडणवीस म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.