आधी 50 टक्के टॅरिफ लादत भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर गेल्या आठवड्यात H-1B व्हिसाचे शुल्क लाखो डॉलर्स करत मोठा धक्का दिला. अमेरिकेच्या एकेक निर्णयामुळे जगासह भारतालाही मोठा धक्का बसत असून दोन्ही देशांमधील तणाव अद्यापही पूर्णपणे निवळलेला नाही. आपलं ऐकण्यासाठी एकीकडे भारतावर दबाव वाढवायचा आणि दुसरीकडे मात्र शांतता प्रस्थापित केल्याचा दावा करत पुरस्कारासाठी कसे पात्र आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकेक वक्तव्यामुळे आणि निर्णयांमुळे बसलेले धक्के जग पचवत असतानाच आता ट्रम्प पुन्हा चर्चेत आले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करून युद्ध थांबवल्याचा, सीजफायर केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत उपस्थितांना संबोधित करताना ट्रम्प यांनी त्याच विधानाचा पुनरुच्चार करत भारत-पाक युद्ध थांबवल्याचा दावा केला. आपल्या भाषणात ट्रम्प यांनी पुन्हा सांगितले की त्यांनी सात युद्धे थांबवली आहेत. “मी सात अंतहीन युद्धं संपवली, ज्यात भारत आणि पाकिस्तानसोबतचं युद्ध समाविष्ट होतं आणि संयुक्त राष्ट्रांनी मला मदत केली नाही,” असं ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांचा दावा काय ?
संयुक्त राष्ट्रसंघांच्या सर्वसाधारण सभेत ट्रम्प यांनी केलेल्या भाषणाची सर्व जगाने दखल घेतली आहे. सगळ्या जगाचं आपल्याकडे लक्ष आहे, हे लक्षात घेऊच त्यांनी, आपणच अनेक युद्ध थांबवल्याचा पुन्हा दावा केला. ट्रम्प म्हणाले की त्यांनी कंबोडिया आणि थायलंड, कोसोवो आणि सर्बिया, काँगो आणि रवांडा, पाकिस्तान आणि भारत, इस्रायल आणि इराण, इजिप्त आणि इथिओपिया, आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील सुरू असलेली युद्धे संपवली.
यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी संयुक्त राष्ट्रांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “मी युद्ध संपवून लाखो लोकांचे जीव वाचवण्यात खूप व्यस्त होतो.नंतर मला जाणवलं की संयुक्त राष्ट्र संघ आपल्यासाठी नाही. आपल्याकडे अफाट क्षमता आहे, पण ते (संयुक्त राष्ट्र संघ) फक्त कठोर पत्रे लिहितात. पोकळ शब्दांनी युद्ध सुटत नसतात, लढाई थांबत नाही. युद्ध संपवल्यानंतर आणि अब्राहम करारावर वाटाघाटी केल्यानंतर, लोक म्हणतात की मला नोबेल शांतता पुरस्कार मिळाला पाहिजे.” असंही ट्रम्प यांनी नमूद केलं.
दरम्यान सीझफायरबद्दल ट्रम्प यांनी केलेले दावे भारताने वारंवार फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानच्या डीजीएमओंनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याकडून होणाऱ्या विनाशकारी पराभवाच्या भीतीने भारताच्या डीजीएमओशी चर्चा केली आणि युद्धबंदीचा आग्रह केला, असे भारताने सांगितले. ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या भूमिकेचा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनीही फेटाळून लावला होता. मात्र तरीही ट्रम्प यांचे युद्धबंदीचे दावे सुरूच आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या सभेतही त्यांनी याच विषयाचा पुनरुच्चार केला.
पॅलेस्टाईनला मान्यता देण्याबाबत ट्रम्प काय म्हणाले?
पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा करणाऱ्या देशांचा उल्लेख करताना ट्रम्प म्हणाले, “काही लोक पॅलेस्टाईनला एकतर्फी मान्यता देण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे हमासच्या दहशतवाद्यांना त्यांच्या अत्याचारांसाठी चांगले बक्षीस मिळेल.” असं त्यांनी सुनावलं. तसेच रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी नाटोवरही टीका केली.