6,6,6,6,6,6,6,6….6! वैभव सूर्यवंशी नवा सिक्सर किंग, 41 षटकार मारत मोडला मोठा विक्रम
GH News September 24, 2025 08:23 PM

वैभव सूर्यवंशी अवघ्या 14 वर्षांचा असून भारतीय क्रिकेट विश्वास अल्पावधीतच नाव कमावलं आहे. या वयात मुलांना वेगवान चेंडूंचा सामना करताना अडचण येते. त्या वयात वैभव सूर्यवंशी उत्तुंग षटकार मारतो. डावखुऱ्या वैभव सूर्यवंशीने अंडर 19 वनडे क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. वैभवने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 6 षटकारांच्या मदतीने 70 धावा केल्या. यासह एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. वैभव सूर्यवंशी युथ वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. वैभव सूर्यवंशीने अंडर 19 वर्ल्डकप जिंकणारा कर्णधार उन्मुक्त चंदला मागे टाकलं आहे. त्याच्या नावावर 38 षटकार होते. आता वैभवच्या नावावर 41 षटकार झाले आहेत. वैभवने 41 षटकार विक्रमी गतीने मारले आहेत हे देखील विशेष..

उन्मुक्त चंदने 21 सामन्यात 38 षटकार मारले होते. तर वैभवने फक्त 10 सामन्यात 41 षटकार ठोकले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर भारताचा स्टार ओपनर यशस्वी जयस्वालचं नाव येतं. त्याने युथ वनडेत 30 षटकार मारले होते. दरम्यान, वैभव सूर्यवंशीने युथ वनडेत आतापर्यंत 540 धावा केल्या आहेत. यापैकी 26 टक्के धावा या फक्त चौकार आणि षटकार मारून केल्या आहेत. वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात वेगाने खेळी केली. पण अर्धशतकापर्यंत पोहचू शकला नाही. तर दुसऱ्या सामन्यात 68 चेंडूत 70 धावांची खेळी केली. या सामन्यात शतक करेल असं वाटत होतं. पण ऑस्ट्रेलियाच्या आर्यन शर्माने त्याचा झेल घेतला आणि तंबूत पाठवलं.

आशिया कप स्पर्धेत अभिषेक शर्माच्या नावाचा गवगवा आहे. पाकिस्तानी गोलंदाजांना तर त्याने सोलून काढलं. दुसरीकडे अंडर 19 भारतीय संघा वैभव सूर्यवंशीचा जलवा आहे. आयपीएलमध्येही वैभव सूर्यवंशीने वेगवान शतक ठोकलं होतं. समोर दिग्गज गोलंदाज असताना त्यांना फोडून काढलं होतं. वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या पहिल्या पर्वातच 24 षटकारांच्या मदतीने 252 धावा केल्या होत्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 206.55 चा होता. त्यामुळे भविष्यात अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांच्यात तीव्र स्पर्धा दिसणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.