टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत राखली. टीम इंडियाने पाचवा आणि शेवटचा सामना जिंकून इंग्लंडला मालिका जिंकण्यापासून रोखलं. त्यानंतर आता टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2025-2027 या साखळीतील आपली दुसरी आणि मायदेशातील पहिला मालिका खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. उभयसंघातील मालिकेचं आयोजन हे 2 ते 14 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं आहे. रोस्टन चेज विंडीजचं नेतृत्व करणार आहे. मात्र अजूनही भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. भारतीय संघाची येत्या काही तासांत घोषणा होण्याची शक्यता आहे. भारतीय संघात काही खेळाडूंना संधी मिळणार असल्याचं निश्चित आहे. तर काही नव्या चेहऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो.
विंडीज विरूद्धच्या मालिकेसाठी कुणाला संधी मिळणार? याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सूकता लागून राहिली आहे. अध्यक्ष अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेत निवड समितीची ऑनलाईन बैठक पार पडणार आहे. त्यानंतर टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. विंडीज विरुद्ध देवदत्त पडीक्कल याचा समावेश केला जाऊ शकतो. देवदत्तने ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या पहिल्या अनऑफीशियल सामन्यात शतक केलं होतं.
मानव सुथार याने ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. मानवने यासह क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. मानवला या कामगिरीमुळे विंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संधी दिली जाऊ शकते.
टीम इंडियाचा नियमित विकेटकीपर आणि उपकर्णधार ऋषभ पंत याला पायाच्या फ्रॅक्चरमुळे विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावं लागणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. अशात पंतच्या जागी भारतीय संघात ध्रुव जुरेल याला संधी देण्यात येऊ शकते. तसेच बॅकअप म्हणून एन जगदीशन याचा समावेश केला जाऊ शकतो. ऑलराउंडर अक्षर पटेल याचंही कमबॅक होऊ शकतं.
वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ : शुबमन गिल (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अभिमन्यु ईश्वरन, नारायण जगदीशन, देवदत्त पडिक्कल आणि मानव सुथार.