आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीचे सामने सुरु आहेत. या फेरीतून 2 संघ अंतिम फेरीत जागा पक्की करणार आहे. सध्याची स्थिती पाहता अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होऊ शकते. भारताने सुपर 4 फेरीत बांगलादेशला पराभूत केल्यानंतर अंतिम फेरीतील स्थान पक्कं होईल. तर पाकिस्तान बांग्लादेश सामन्यातून विजेता संघ अंतिम फेरी गाठेल. सध्या तरी असं समीकरण दिसत आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामना अंतिम फेरीत होऊ शकतो. म्हणजेत भारत आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा अंतिम फेरीत भिडू शकतात. भारताने या स्पर्धेत दोनदा पाकिस्तानला पराभूत केलं आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा पाकिस्तानचा समोर असल्यास कमी लेखून चालणार नाही. अशा स्थितीत अंतिम फेरीतील जागा पक्की होण्यापूर्वीच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने भारताला ओपन चॅलेंज दिलं आहे.
शाहीन शाह आफ्रिदी म्हणाला की, “टीम इंडिया अद्याप अंतिम फेरीत पोहोचलेली नाही. जर ते अंतिम फेरीत पोहोचले तर आम्ही त्यांना बघून घेऊ. आम्ही अंतिम सामना आणि आशिया कप जिंकण्यासाठी येथे आहोत. कोणताही संघ अंतिम फेरीत पोहोचला तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत. आम्ही त्यांना पराभूत करू.” दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. त्यानंतर सूर्यकुमार यादवने पाकिस्तानला डिवचलं होतं. सूर्यकुमार यादव म्हणाला होता की, भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणतीही स्पर्धा नाही कारण शेजारी देश अलिकडच्या वर्षांत सातत्याने पराभूत होत आहे.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर हा हायव्होल्टेज सामना होणार आहे. कारण स्पर्धेत पाकिस्तानला दोन वेळा पराभूत केलं असलं तरी अंतिम फेरीत पाय जमिनीवर ठेवूनच पाकिस्तानला धडा शिकवावा लागला आहे. भारतीय संघाकडे पाहिलं तर भारत हमखास पाकिस्तानला तिसऱ्यांदा पराभूत करेल यात काही शंका नाही. पण पाकिस्तानला जिंकण्याची कोणतीच संधी मिळता कामा नये यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. दरम्यान, पाकिस्तानची स्थिती अशी आहे की बांगलादेशही पराभूत करू शकतो. त्यामुळे त्यांचं आव्हान सुपर 4 फेरीतच संपुष्टात येऊ शकतं.