आशिया कप 2025 स्पर्धेत अभिषेक शर्माचा रुद्रावतार पाहून प्रतिस्पर्धी गोलंदाजांना घाम फुटला आहे. अभिषेक शर्माने तर पाकिस्तानी गोलंदाजांची दोन सामन्यात हवाच काढली. त्यामुळे टी20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावाची किती दहशत आहे दिसून येते. असं असताना आयसीसीने टी20 क्रिकेटची नवी क्रमवारी जाहीर केली आहे. टी20 क्रिकेटमध्ये टीम इंडिया आणि खेळाडूंचा दबदबा आहे. भारतीय संघ, भारतीय फलंदाज भारतीय गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूने नंबर 1 चं स्थान पटकावलं आहे. यात पहिल्या क्रमांकावर अभिषेक शर्माने जम बसवला आहे. यात तसं काही नवीन नाही. पण या स्थानावर विराजमान असताना त्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. अभिषेक शर्मा हा 900 हून अधिक रेटिंग पॉइंट मिळवणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमार यादव 912 या रेटिंगवर पोहोचला होता. तर विराट कोहलीन 909 रेटिंगसह या क्रमवारीत होता. आता अभिषेक शर्माने 907 रेटिंग पॉइंटपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे आशिया कपच्या उर्वरित सामन्यात त्याने आक्रमक खेळी अशी सुरु ठेवली तर या दोघांना मागे टाकेल.
अभिषेक शर्मा हा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला डावखुरा फलंदाज आहे. त्याने इतक्या रेटिंग पॉइंटपर्यंत मजल मारली आहे. अभिषेक शर्माने अजून 13 पॉइंटची कमाई केली तर क्रिकेट इतिहासात सर्वाधिक रेटिंग पॉइंट मिळवणारा टी20 फलंदाज होईल. इंग्लंडच्या डेविड मलाने 2020 या वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 919 पॉइंट मिळवले होते. आता अभिषेक शर्मा 907 पॉइंटसह नाबाद आहे. त्यामुळे त्याच्याकडे हा विक्रम मोडण्याची संधी आहे.
अभिषेक शर्माचा फॉर्म पाहत तो आशिया कप स्पर्धेतच विक्रम मोडू शकतो. अभिषेक शर्मा षटकार आणि स्ट्राईक रेटमध्येही टॉपला आहे. अभिषेक शर्माने 4 सामन्यात सर्वाधिक 173 धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 208 पेक्षा जास्त आहे. आतापर्यंत 12 षटकार आणि 17 चौकार मारले आहेत. सुपर 4 फेरीत भारताचा पुढचा सामना बांग्लादेश आणि श्रीलंकेशी होणार आहे.