भोरमधील शिबिरात १३५ जणांची तपासणी
esakal September 25, 2025 05:45 AM

भोर, ता. २४ ः शहरातील वेताळ पेठ परिसरातील तुफान मित्र मंडळ आणि जय मातादी महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात १३५ जणांची तपासणी करण्यात आली.
नवरात्र उत्सवानिमित्त मंगळवारी (ता. २३) आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिरात पुण्यातील नवले ब्रीज येथील सिल्व्हर बर्च हॉस्पिटलच्या चार डॉक्टरांनी तपासण्या केल्या. सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत रक्तदाब, मधुमेह, ईसीजी आदी प्रमुख तपासण्यांसह इतरही तपासण्या करण्यात आल्या. आवश्यक त्या रुग्णांना औषधे देण्यात आली आणि समुपदेशनही करण्यात आले. काहींना पुढील तपासण्या व उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येणार आहे. याशिवाय सिल्व्हर बर्च हॉस्पिटलच्या वतीने आवश्यक त्या रुग्णांवर अल्पदरात शस्रक्रिया केली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. नवरात्र उत्सवामुळे शिबिरात महिलांची संख्या जास्त होती. यावेळी तपासणीसाठी आलेल्या सर्वांना फळांचे वाटपही करण्यात आले. तुफान मित्र मंडळ व जय मातादी महिला मंडळाच्या सदस्यांनी या आरोग्य शिबिराचे नियोजन केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.