खुटबाव, ता.२४ : नानगाव ( ता.दौंड) येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे शासन व लोकसहभागातून दौंड तालुक्यातील पहिले स्मारक उभारणार, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप पाटील खळदकर यांनी केले.
नानगाव येथील मुख्य चौकामध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४वी जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खळदकर म्हणाले की, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेजारील दोन गुंठे जागेमध्ये स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल व जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत. शासनाचा निधी, लोकवर्गणीतून उमाजी नाइकांचा पुतळा व परिसर सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या वेळी उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्रवादी प्रदेश युवक चिटणीस विकास पाटील खळदकर, उपसरपंच विष्णू खराडे, रयत क्रांती संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष बापूसाहेब खोमणे , नवनाथ मंडले, दादा खोमणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला राहुल वळू, गोरख जाधव, दत्तात्रेय खोमणे, सुनील खोमणे, सुनील आढागळे, सचिन शेलार तसेच जय मल्हार तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी जेजुरी ते नानगाव ज्योत आणण्यात आली. सागर चव्हाण यांचे उमाजी नाईक यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान झाले.