पिंपरी : दिवाळी म्हणजे खमंग फराळ, बच्चे कंपनीकडून तयार केला जाणारा किल्ला, पणत्या-आकाशदिवा आणि झगमगती रोषणाई...मात्र, गेल्या काही वर्षांपासून दिवाळीनिमित्त घराला एक उत्सवाचा खास ‘लुक’ देण्याची पद्धत रूढ होत आहे.
या साठी अगदी कलात्मक पद्धतीने घर सजविले जाते. यासाठी बाजारपेठांमधून वैविध्यपूर्ण साहित्य खरेदी केले जात आहे. यामध्ये पारंपरिक आणि दुर्मीळ वस्तूंचीही मागणी होत आहे. घरी कोणता कार्यक्रम किंवा सण असला, तरी कपड्यांपासून ते सजावटीपर्यंत सर्व काही खरेदी करण्यापूर्वी तरुणाईकडून ‘सोशल मीडिया’वर काय ‘ट्रेंड’ आहे हे पाहिले जाते.
त्यानुसार खरेदी केली जाते. दिवाळीनिमित्तही नागरिक याचेच अनुकरण करत आहेत. त्यामुळे ‘रील्स’ आणि व्हिडिओ पाहून सजावट करण्याकडे कल दिसून येत आहे. यामध्ये पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून तोरण, हार, आकाशकंदील, माळा, दिवे तयार केले जात आहे. त्यासाठी आवश्यक साहित्याला बाजारांमध्ये मोठी मागणी आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सजावट साहित्यांतील ‘ट्रेंड’दारावर लावण्यासाठी मोठे हार, तोरण, विद्युत दिवे असलेल्या मण्यांच्या माळा यांची सध्या खरेदी केली जात आहे. लोकर, कापड, मणी, क्रिस्टलपासून तयार केलेले मोठे तोरणही उपलब्ध आहेत. याची किंमत २०० रुपयांपासून पुढे आहे. घरातील लॉबी, टेरेस तसेच देवघरालाही दिवाळीनिमित्त सजावट केली जाते. त्यासाठीही दिव्यांचे स्टॅंड, कुंदन पणत्या यांना मोठी मागणी आहे. प्लॅस्टिकची फुले, पाण्यावर तरंगणारे दिवे, झुंबर, भितींवर लावण्यासाठी कागदी दिवे, दिव्यांच्या आकारांचे कटआऊटही खरेदी केली जात आहे.
Pune Diwali Shopping : पुण्यात दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या; गर्दीमुळे वाहतूक कोंडी, वाहतूक नियोजनासाठी केला खास उपाय..दिवाळीच्या सजावट साहित्यात यंदा अधिक प्रकार उपलब्ध आहेत. ‘रील्स’मध्ये पाहिलेल्या साहित्यांची खरेदी नागरिक करत आहेत. ऑनलाइन ट्रेंड लक्षात घेऊनच आम्ही साहित्य विक्रीसाठी आणले आहे. पारंपरिक वस्तूंमध्ये माळा, हार, तोरणे, फुलांना मागणी आहे. तसेच क्रिस्टलचे झुंबर, मोती माळा, तोरणांचीही खरेदी केली जात आहे.
- जय वनवारी, सजावट साहित्य विक्रेता