जळगाव: टोणगाव (ता. भडगाव) शिवारातील गट क्रमांक ५६१/१ मध्ये ५० ते ६० वर्षे जुन्या मोठ्या वृक्षांची बेसुमार कत्तल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भडगाव नगरपालिकेस केवळ १४ झाडे तोडण्यासाठी परवानगी मागून शेकडो डेरेदार वृक्षांची कत्तल करून रातोरात विल्लेवाट लावण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.
पर्यावरण मित्र सलीम सखावत खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मागील आठ दिवसांपासून सुमारे १५० झाडांची तोड झाली आहे. अजून २०० ते ३०० झाडे तोडण्यासाठी उभी आहेत. टोणगाव शिवारातील ही जमीन गेल्या ४० वर्षांपासून पडिक होती. २०२३- २४ मध्ये या जमिनीची नोंद ‘खासगी वन क्षेत्र’, म्हणून करण्यात आली आहे.
या परिसरात आंबा, जांभूळ, चिंच, निगळ, सिसम, खैर, हिरडा अशा विविध प्रजातींची सुमारे ५० फूट उंचीची मोठी डेरेदार वृक्ष उभी होती. अचानकपणे या झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. भडगाव नगरपालिकेकडून केवळ गट क्रमांक ५६१/१ मधील १४ झाडांची तोड करण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, संबंधित व्यक्तींनी १५ ते २० झाडांची तोड केली असून, कापलेल्या झाडांची बुंधे जमिनीत गाडण्याचा घाट सुरू आहे.
पर्यावरणीय गुन्ह्यांचे झाकलेले कोंबडेसलीम खान यांच्या तक्रारीनंतर नगरपालिकेच्या पर्यावरण विभागाकडून विचारणा झाल्यानंतर रातोरात तोडलेल्या वृक्षांच्या लाकडाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तक्रारदार आणि सुज्ञ ग्रामस्थांनीही याबाबत भडगाव नगरपालिकेकडे तक्रार केली असून, पालिकेने दिलेली परवानगी आणि घटनास्थळावर झालेली वृक्षतोडची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.