वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसो़टी सामन्यात भारताने फॉलोऑन दिला. पण हा निर्णय एक क्षण अंगलट येतो की काय असं वाटलं होतं. पण पाचव्या विकेटपासून नवव्या विकेटपर्यंत धडाधड विकेट पडल्या. त्यानंतर दहाव्या विकेटसाठी संघर्ष करावा लागला. वेस्ट इंडिजने भारतासमोर विजयासाठी 121 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यापैकी चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 1 गडी गमवून 63 धावा केल्या आहेत. अजूनही भारताला 58 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने 33 षटकं टाकली. त्यात 10 षटकं निर्धाव टाकली आणि 102 धावा देत 1 गडी बाद केला. एका विकेटसह रवींद्र जडेजाने हरभजन सिंगचा विक्रम मोडला आहे. तसेच अनिल कुंबळे आणि आर अश्विन यांच्या पंगतीत बसला आहे.
रवींद्र जडेजाने सलामी आलेल्या जॉन कॅम्पबेलची विकेट काढली आणि विक्रम नावावर केला आहे. रवींद्र जडेजा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत बसला आहे. अशी कामगिरी करणारा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. माजी फिरकीपटू हरभजनला सिंगला मागे टाकलं आहे. हरभजनने 376 विकेट घेतल्या आहेत. आता रवींद्र जडेजाच्या नावावर 377 विकेट आहेत. या यादीत अनिल कुंबळे 476 विकेटसह अव्वल स्थानी आहे. तर त्या खालोखाल आर अश्विन असून त्याने 475 विकेट घेतल्या आहे.
पहिल्या डावात रवींद्र जडेजाने 19 षटके टाकली आणि तीन फलंदाजांना बाद केले. दुसऱ्या डावात त्याने फक्त एकच बळी घेतला. रवींद्र जडेजा हा भारताचा विश्वासाचा गोलंदाज आहे. पण अष्टपैलू कामगिरी भारताच्या फायद्याची ठरते. गोलंदाजीच नाही तर फलंदाजीतही जडेजा कमाल करतो. दरम्यान, या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन वनडे आणि पाच टी20 सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात रवींद्र जडेजाची निवड झालेली नाही. दुसरीकडे, भारताने दुसरा कसोटी सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजयी टक्केवारीत फरक पडणार आहे. स्थानात तसा काही फरक पडणार नाही. पण विजयी टक्केवारी मात्र सुधारेल.