सोमाटणे, ता. १३ः पावसाच्या उघडिपीनंतर दुधाचे उत्पादन वाढल्याने शेतीचा जोडधंदा म्हणजे म्हशींच्या दूध उत्पादन व्यवसायात वाढ झाली आहे.
पवनमावळ पूर्व भागातील सोमाटणे, गहुंजे, सांगवडे, दारुंब्रे, गोडुंब्रे, कुसगाव, साळुंब्रे येथील शेतकरी मागील अनेक वर्षापासून
म्हशी पालन व्यवसाय करतात. यावर्षी मे महिन्यापासूनच पावसाला सुरवात झाली ती चार ऑक्टोबरपर्यंत सुरु होती. या काळात दूध देणाऱ्या जनावरांच्या खुराकाचा खर्च वाढला तर उत्पादन घटले होते. परिणामी गेले पाच महिने या व्यवसायातून शेतकऱ्यांना फारसा नफा मिळत नव्हता. परंतु, पाच ऑक्टोबरपासून पावसाने पूर्ण उघडीप दिली त्यामुळे म्हशींची दूध देण्याची क्षमता वाढल्याने दुधाचे उत्पादन वाढले. सध्या प्रती म्हशीपासून आठ ते दहा लिटर पेक्षा अधिक दूध मिळते. खासगी विक्रेते ६५ रुपये प्रती लिटरप्रमाणे दूध खरेदी करतात. म्हशींचे खाद्य, औषधे, व्यवस्थापन आदी मजुरीचा खर्च प्रति लिटर चाळीस रुपये येत असून पंचवीस रुपये प्रति लिटर नफा शिल्लक राहत असल्याने दूध व्यवसायाला चांगले दिवस आले, अशी माहिती दूध उत्पादक शेतकरी, दिलीप राक्षे यांनी दिली आहे.
साळुंब्रे ः अद्ययावत केलेला म्हशींचा गोठा.