मुंबई-अहमदाबाद बुटेल ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. येत्या काही वर्षांमध्ये बुलेट ट्रेन धावण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे या बुलेट ट्रेन प्रकल्पाची उत्सुकता वाढली आहे. अशातच आता गुजरातमधील पारुल विद्यापीठाच्या 30 हून अधिक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी नुकतीच मुंबई–अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे (MAHSR) प्रकल्पाच्या C-2 पॅकेज साइटला भेट देत अत्याधुनिक नागरी अभियांत्रिकी पद्धती आणि पायाभूत सुविधा उभारणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
पारुल विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून बुटेल ट्रेन प्रकल्पाची पाहणीया विद्यार्थ्यांना ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे श्री संदीप देसाई, कार्यकारी उपाध्यक्ष, श्री अरुण देवरे, मुख्य जोखीम अधिकारी, आणि श्री सुनील त्यागी, प्रकल्प संचालक यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या चर्चेत त्यांनी प्रकल्प व्यवस्थापन, अभियांत्रिकी उत्कृष्टता आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांतील जोखीम व्यवस्थापन याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली.
सिव्हिल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना विक्रोळी येथील प्रकल्प स्थळाची फेरी करून देण्यात आली. त्यांनी तेथील एका शाफ्टलाही भेट दिली. तसेच तेथील अभियंत्यांशी संवाद साधून प्रकल्पातील तांत्रिक व व्यवस्थापकीय गुंतागुंतीची माहिती मिळवली. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी बांधकामातील आव्हाने, कार्यपद्धती आणि देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात वापरल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाविषयी सविस्तर चर्चा केली.
या भेटीमुळे विद्यार्थ्यांना भारताच्या सर्वात महत्त्वाकांक्षी परिवहन प्रकल्पाविषयी प्रत्यक्ष समजून घेण्याची दुर्मिळ संधी मिळाली. तसेच वर्गातील शिक्षण आणि प्रत्यक्ष अभियांत्रिकी अनुभव यातील दुवा साधण्याची मौल्यवान संधी प्राप्त झाली.
बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा 2027 पर्यंत सुरू होणारमुंबई-अहमदाबाद दरम्यानचा हा रेल्वेमार्ग विकसित भारताकडे एक पाऊल असणार आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. ‘या प्रकल्पाचा पहिला 50 किलोमीटरचा सुरत ते बिलीमोरा दरम्यानचा टप्पा 2027 पर्यंत सुरु होईल. यासाठी तयारी सुरु आहे. 2028 पर्यंत हा ठाणे-अहमदाबाद हा विभाग कार्यान्वित होईल आणि 2029 पर्यंत संपूर्ण मुंबई-अहमदाबाद पूर्ण प्रकल्प सुरु होईल. या मार्गावर ताशी 320 किमी वेगाने ट्रेन धावू शकणार आहे असं वैष्णव यांनी म्हटलं होतं.