IND vs WI, 2nd Test: विंडीजच्या शतकवीराची विकेट रवींद्र जडेजासाठी विक्रमी! हरभजन सिंगला मागे टाकत भारतात केला 'हा' पराक्रम
esakal October 14, 2025 01:45 AM
  • भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजाने विक्रमी कामगिरी केली.

  • दुसऱ्या डावात जॉन कॅम्पबेलला बाद करत जडेजाने एका मोठ्या विक्रमाच्या यादीत हरभजन सिंगला मागे टाकले आहे.

  • जडेजाने या सामन्यात एकूण ४ विकेट्स घेतल्या.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी मालिकेतील दुसरा सामना पाचव्या दिवसापर्यंत गेला आहे. चौथ्या दिवशी निकाल लागेल असं चित्र होतं, मात्र वेस्ट इंडिजने चांगली झुंज दिली आणि हा सामना पाचव्या दिवसापर्यंत नेण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने या सामन्यात एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.

सटासट...! IND vs WI सामन्यात तरुणीने शेजारी बसलेल्या तरुणाच्या कानाखाली जाळ काढला, Video Viral

य सामन्यात फॉलोऑननंतर दुसऱ्या सत्रात वेस्ट इंडिजने चांगली फलंदाजी केली. वेस्ट इंडिजच्या डावाचा भक्कम पाया जॉन कॅम्पबेल आणि शाय होप यांनी रचला होता. त्यांनी ३५ धावांवर २ विकेट गेल्यानंतर एकत्र फलंदाजी करताना तब्बल १७७ धावांची भागीदारी करत संघाला सावरलं.

या भागीदारीदरम्यान कॅम्पबेलने त्याचे पहिले कसोटी शतकही केले. अखेर ही धोकादायक ठरणारी जोडी रवींद्र जडेजाने तोडली. त्याने शतकवीर जॉन कॅम्पबेलला ६४ व्या षटकात पायचीत केले आणि भारताला तिसरी विकेट मिळवून दिली. कॅम्पबेलने १९९ चेंडूत ११५ धावांची खेळी केली. दरम्यान, ही विकेट जडेजासाठी विक्रमी ठरली.

या विकेटमुळे तो आता भारतात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. त्याने हरभजन सिंगला मागे टाकले आहे. जडेजाच्या आता भारतात १५२ सामन्यांतील १९९ डावात ३७७ आंतरराष्ट्रीय विकेट्स झाल्या आहेत.

हरभजन सिंगने ३७६ विकेट्स भारतात खेळताना घेतल्या आहेत. या यादीत पहिल्या दोन क्रमांकावर अनुक्रमे अनिल कुंबळे (४७६) आणि आर अश्विन (४७५) आहेत.

भारतासाठी मायदेशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारे गोलंदाज
  • ४७६ विकेट्स - अनिल कुंबळे (२०४ डाव)

  • ४७५ विकेट्स - आर अश्विन (१९३ डाव)

  • ३७७ विकेट्स - रवींद्र जडेजा (१९९ डाव)

  • ३७६ विकेट्स - हरभजन सिंग (१९९ डाव)

  • ३१९ विकेट्स - कपिल देव (२०२ डाव)

दरम्यान, जडेजाला वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात एकच विकेट मिळाली. त्याने पहिल्या डावात ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. तथापि जडेजासाठी ही मालिका चांगली राहिली आहे. त्याने पहिल्या सामन्यात शतक केले होते आणि ४ विकेट्स घेतल्या होत्या.

तथापि, दुसऱ्या कसोटीबद्दल सांगायचे झाले, तर भारताने पहिला डाव ५ बाद ५१८ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात सर्वबाद २४८ धावा केल्या. पण २७० धावांनी त्यांना पिछाडी स्वीकारावी लागल्याने भारताने त्यांना फॉलोऑन दिला.

IND vs WI, 2nd Test: वेस्ट इंडिजचं कौतुक करायला हवं... फॉलोऑननंतरही भारतासमोर उभं केलं आव्हान; शुभमन गिलच्या संघाच्या टप्प्यात विजय

मात्र दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजने चांगले पुनरागमन करताना २७० धावांची पिछाडी भरून काढत १२० धावांची आघाडीही घेतली. वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात सर्वबाद ३९० धावा केल्या. त्यामुळे त्यांनी भारतासमोर १२१ धावांचे लक्ष्य ठेवले.

या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवस अखेरपर्यंत १८ षटकात १ बाद ६३ धावा केल्या. त्यामुळे आता पाचव्या दिवशी भारताला ५८ धावांची गरज आहे, तर वेस्ट इंडिजला ९ विकेट्सची गरज आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.