वाकड, ता. १३ : येथील वेस्टर्न अव्हेन्यू ज्येष्ठ नागरिक संघाचा पहिला वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा झाला. श्यामल कुकडे यांच्या स्वरसाधना व सरगम ग्रुप यांच्या गायनाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. परिसरातील रहिवाशांच्या समस्या आणि उपाययोजना यावरही सखोल चर्चा झाली.
संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम गोडबोले अध्यक्षस्थानी होते. आमदार शंकर जगताप, भाजपचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर, माजी नगरसेवक संदीप कस्पटे, पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या प्रा. भारती विनोदे, विशाल कलाटे, श्रीनिवास कलाटे, कुणाल वाव्हळकर, श्रुती वाकडकर, प्रसाद कस्पटे, रामदास कस्पटे आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे दिशादर्शक आहेत. त्यांच्या अनुभवातून समाजाला योग्य दिशा मिळते. वेस्टर्न अव्हेन्यू संघाचे कार्य आदर्शवत आहे, अशा शब्दांत आमदार जगताप यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले.
उपाध्यक्षा स्नेहल घोसाळकर, सचिव खंडेराव कुलकर्णी, सहसचिव संजय घोसाळकर, ज्येष्ठ मार्गदर्शक मुकुंद डमकले, खजिनदार संजय बोधले, शोभा वाडेकर यांनी संघाच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यकारिणी सदस्य व स्वयंसेवकांनी संयोजन केले.
WKD25A09634