Nashik Police : वडाळा रस्त्यावरील टवाळखोरांचे अड्डे जाळून खाक! इंदिरानगर पोलिसांनी दाखवल्या 'खाक्या'
esakal October 14, 2025 03:45 AM

इंदिरानगर: इंदिरानगर पोलिसांनी वडाळा येथील शंभर फुटी रस्त्यावर टवाळखोरांच्या आणि नशेबाजांच्या बसण्याचे अड्डे असलेल्या झोपड्या जाळून खाक केल्या. रविवारी (ता.१२) सायंकाळी पोलिसांनी ही कारवाई केली.

येथील म्हाडा वसाहतीच्या पुढे मांगीरबाबा चौकात महापालिकेने अतिक्रमण काढून केलेल्या मोकळ्या जागेत या टवाळखोरांनी झोपड्या बांधल्या होत्या. झोपड्यांना त्यांच्या ग्रुपचे नावे देखील ठेवण्यात आली होती.

येथे बसून तासन्तास गेम खेळणे, नशा करणे, छेडछाड करणे आदी प्रकार सर्रास चालत होते. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या झोपड्या पाडल्या. मात्र, तेथील सामान एकत्र करून पुन्हा त्या झोपड्या उभारण्याच्या प्रयत्नात हे टवाळखोर होते.

Pune Crime : पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याला टोळक्याकडून जबर मारहाण, रात्री ड्यूटी संपवून घरी निघाला अन्...

रविवारी सायंकाळी वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे, सहायक निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्यासह, उपनिरीक्षक संतोष फुंदे, पवन परदेशी, सागर परदेशी, अमजद पटेल, योगेश जाधव, महेश पारनकर, डोळस आदींनी धडक कारवाई करत या झोपड्यांचे सगळे सामानच जाळून टाकले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांनी देखील उत्स्फूर्त स्वागत केले. संपूर्ण परिसराची सर्वांगाने एकदा स्वच्छता करूनच टाका अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.