पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील सलामीचा सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. उभयसंघातील पहिला कसोटी सामना हा लाहोरमध्ये खेळवण्यात येत आहेत. सामन्यातील तिसरा दिवस हा खऱ्या अर्थाने गोलंदाजांनी गाजवला. तिसऱ्या दिवशी गोलंदाजांनी एकूण 16 विकेट्स मिळवल्या. त्यामुळे सामना अखेरच्या टप्प्यात पोहचला आहे. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर 277 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेने या धावांचा पाठलाग करताना दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 51 धावा केल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 226 धावांची गरज आहे. तर यजमान पाकिस्तान 8 विकेट्सने पहिल्या विजयापासून दूर आहे. त्यामुळे कोणता संघ हा सामना जिंकणार? याची उत्सूकता शिगेला पोहचली आहे.
पाकिस्तानने पहिल्या डावात ऑलआऊट 378 रन्स केल्या. दक्षिण आफ्रिकेने 269 धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर दुसऱ्या डावात 167 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 277 रन्सचं टार्गेट मिळालं. आता दक्षिण आफ्रिका उर्वरित आव्हान पूर्ण करणार की पाकिस्तान पाहुण्यांना रोखणार? हे येत्या तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.
तिसऱ्या दिवशी दोन्ही संघांनी एकूण 16 विकेट्स गमावल्या. दक्षिण आफ्रिकेने 6 आऊट 216 रन्सपासून खेळाला सुरुवात केली. मात्र दक्षिण आफ्रिकेला उर्वरित 4 विकेट्सच्या मोबदल्यात 53 धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी टॉनी डी जॉर्जी याने शतक झळकावलं. मात्र जॉर्जी 104 धावांवर आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर पाहता ते सहज 300 पार मजल मारतील असं चित्र होतं. दक्षिण आफ्रिकेने 7 विकेट्स गमावून 256 रन्स केल्या होत्या. मात्र पाकिस्तानने 13 धावांच्या मोबदल्यात दक्षिण आफ्रिकेला 3 झटके दिले आणि 269 रन्सवर ऑलआऊट केलं. पाकिस्तानला अशाप्रकारे 109 रन्सची आघाडी मिळाली.
पाकिस्तानने छोट्या भागीदारींच्या जोरावर 100 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानला 100 पर्यंत पोहचवण्यात बाबर आझम याने 42 धावांचं योगदान दिलं. पाकिस्तानने 4 विकेट्स गमावून 150 धावा केल्या. पाकिस्तानची 200 धावांच्या दिशेने वाटचाल सुरु होती. मात्र सेनुरन मुथुस्वामी याने आपल्या फिरकीच्या जोरावर सामन्याचं चित्रच बदललं.
सेनुसर याने पाकिस्तानच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. सेनुरनच्या फिरकीमुळे दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला 17 धावांच्या मोबदल्यात 7 झटके दिले. त्यामुळे पाकिस्तानचं दुसऱ्या डावात 167 रन्सवर पाकिस्तानचं पॅकअप झालं.
त्यानंतर 277 धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने दिवसाचा खेळ संपपेर्यंत 2 विकेट्सच्या मोबदल्यात 51 रन्स केल्या आहेत. अशाप्रकारे तिसऱ्या दिवशी 16 विकेट्स पडल्या. आता चौथ्या दिवशी सामन्याचा निकाल लागणार का? निकाल लागला तर कोणता संघ मैदान मारणार? यासाठी सामन्याच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे.