उंडवडी, ता. १४ : बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्यात ऊस पिकावर पांढरा लोकरी माव्याचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. सोनवडी सुपे परिसरातील शेतकरी आता पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून कीटकनाशकांची फवारणी करत असून, त्यातून वेळ, श्रम आणि खर्चात मोठी बचत होत आहे.
उंडवडी सुपे, सोनवडी सुपे, कारखेल, उंडवडी कडेपठार, जळगाव सुपे, खराडेवाडी, गोजुबावी, बऱ्हाणपूर व साबळेवाडी परिसरात ऊस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. एप्रिल ते जून या कालावधीत बहुतांश शेतकऱ्यांनी उसाची नवीन लागवड केली आहे.
ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणारा पाऊस यामुळे यंदा माव्याचा प्रादुर्भाव अधिक तीव्र झाला आहे. वाढलेल्या उसात पारंपरिक पद्धतीने पाटीवरून पंप घेऊन फवारणी करणे अवघड ठरत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी ड्रोनचा पर्याय स्वीकारला आहे.
ड्रोन फवारणीमुळे औषधांचा प्रमाणबद्ध वापर होतो, तसेच वेळ, मजूर व खर्चातही बचत होते. सोनवडी सुपे येथील शेतकरी सुलोचना मोरे, ओंकार मोरे व संतोष मोरे यांनी नुकतीच उसावर ड्रोनद्वारे फवारणी करून घेतली.
“आधुनिक तंत्रज्ञानामुळे ऊस पिकाचे संरक्षण अधिक सुलभ व परिणामकारक झाले आहे,” असे सोनवडी सुपे येथील शेतकरी संतोष मोरे यांनी सांगितले.
03048