छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. तर काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतात. मात्र या मालिकांचा सगळं खेळ हा टीआरपीवर अवलंबून असतो. नवीन मालिका आणि रिऍलिटी शो यामुळे वाहिनीच्या टीआरपीमध्ये चांगलाचा फरक पडतो. जर हे कार्यक्रम हिट ठरले तर वाहिनीला त्याचा फायदा होतो. त्यामुळे नवीन नवीन मालिका दाखवण्याकडे प्रेक्षकांचा कल असतो. आता कलर्स मराठीने देखील अशाच एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. या कार्यक्रमात अनेक मोठया अभिनेत्री दिसणार आहेत. या नव्या कार्यक्रमाचा प्रोमोदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
कलर्स मराठीने नुकताच नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. यात अलका कुबल, निवेदिता सराफ, सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे, अदिती सारंगधर, दीपा परब, क्रांती रेडकर या अभिनेत्रीदिसत आहेत. या प्रोमोच्या सुरुवातीला दीपा परब म्हणते, “प्रत्येक यशस्वी पुरुषामागे बाई असते आणि यशस्वी बाईमागे?”, पुढे अलका कुबल म्हणतात, “बाईच्या डोक्यावर पदर हवाच; पण तेवढा आदर तरी देताय का? याचाही विचार हवाच ना?”, क्रांती रेडकर म्हणते, “बाईने मात्र ७ च्या आत घरात आलं पाहिजे; पण ते येतात का कधी ७ च्या आत घरात?”
प्रोमोमध्ये पुढे प्रार्थना बेहेरे दिसते. ती म्हणते, “गळ्यात मंगळसूत्र म्हणजे लग्नाचं प्रतीक. पण, पुरुषांच्या गळ्यात काहीच नसतं.” निवेदिता सराफ म्हणतात, “घरातल्या सगळ्यांचं सगळं कोण करतं? बाई…”, अलका कुबल म्हणतात, “बाई लग्न करून दुसऱ्यांच्या घरात येते, त्यांना आपलंसं करते.” सुकन्या मोने म्हणतात, “ती गाडी चालवते, ट्रेन चालवते. अगदी विमानसुद्धा चालवते”, अदिती सारंगधर म्हणते, “आठवड्यातला एक दिवस तरी घरच्या बाईला सुट्टी द्यायलाच हवी”, प्रार्थना म्हणते, “नावापुढे लावायला वडिलांचं नाव; पण ठेच लागली की, आपण आई गं, असंच म्हणतो ना?”
View this post on InstagramA post shared by Marathi World Entertainment (@marathiiworld)
कलर्स मराठीच्या नव्या कार्यक्रमाचं नाव 'बाईपण जिंदाबाद' असं आहे. तर कलर्सने हा प्रोमो शेअर करत लिहिलं, ' एक बाई आपल्या घराला तिचं संपूर्ण जग बनवते; पण त्याच घरात ती स्वतःचं जग हरवून बसते. ‘बाईपणा’चा खरा अर्थ सांगायला, महानायिका येत आहेत हृदयस्पर्शी कथांसह आपल्या भेटीला.' हा कार्यक्रम २६ ऑक्टोबर २०२५ पासून दर रविवारी रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे. मात्र इतक्या नायिका एकत्र येऊन नेमकं प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार, या कार्यक्रमाची नेमकी थीम काय आहे याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. तर कलर्सवरील कोणतीही मालिका निरोप घेणार नाहीये.
अमिताभ बच्चन यांची मोठी गुंतवणूक; अलिबागमधील 'या' गावात खरेदी केली जमीन; कितीचा झाला व्यवहार?