सिडकोच्या घरांची दिवाळी लॉटरी लांबणीवर
esakal October 15, 2025 12:45 PM

घरांच्या विक्रीचे शिवधनुष्य
सिडकोची दिवाळीतील लॉटरी लांबणीवर, किमतींमुळे प्रश्नचिन्ह
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ : सिडकोच्या ‘माझे पसंतीचे घर’लॉटरीतील घरांच्या किमतींवर वाद सुरू आहे. राजकीय पक्षांकडून याविरोधात आंदोलने सुरू असल्याने घरांच्या वाढीव किमतींचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. अशातच पुन्हा दुसऱ्या लॉटरीचे शिवधनुष्य सिडकोला पेलवणार नसल्याने दिवाळीत निघणारी लॉटरी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
सिडकोने २०२४ ला माझे पसंतीचे घर, या शीर्षकाखाली २६ हजार घरांची सोडत जाहीर केली होती. या योजनेंतर्गत नवी मुंबईतील विविध नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता सदनिका उपलब्ध केल्या होत्या. नवी मुंबईतील बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, खारघर पूर्व (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, नवीन पनवेल, कळंबोली, वाशी नोडमधील घरांचा समावेश होता. लॉटरीमध्ये सहभागी होणाऱ्या अर्जदाराला आवडत्या १५ घरांचा पर्याय भरता येत होता, मात्र फेब्रुवारीत योजनेची संगणकीय सोडत जाहीर झाली. तेव्हा पाच हजारांपेक्षा जास्त घरे शिल्लक राहिल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, २६ हजार घरांसाठी लॉटरी असताना २१ हजार घरांना प्रतिसाद मिळाला. घरे जास्त आणि अर्जदार कमी, अशी नामुष्की सिडकोवर ओढवल्याने अर्ज भरलेल्यांनाच घरांचे वाटप करण्यात आले, मात्र खारघर, वाशी येथील घरांचे दर अधिक असल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. परिणामी, आधीच्या योजनेतील शिल्लक घरे विक्रीच्या हालचाली सिडकोने सुरू केल्या आहेत.
-----------------------------------
पाच हजार घरे शिल्लक
सद्यःस्थितीत सिडकोकडे पाच हजारांपेक्षा जास्त घरे शिल्लक आहेत. तळोजामध्ये १५ हजारपेक्षा जास्त घरे निर्माण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. खारघर, रोडपाली, उलवे आणि खारकोपर भागातही सिडकोद्वारे गृह संकुले निर्मितीचे काम सुरू आहे. त्यामुळे आणखी २० हजार घरांची योजना सिडको दिवाळीत जाहीर करण्याच्या तयारीत होती, मात्र आधीची सर्व घरे विक्री केल्याशिवाय नवीन घरांची योजना जाहीर करायची नाही, अशी अटच असल्यामुळे सिडकोला नवीन गृहयोजना जाहीर करताना अडचण आली आहे.
---------------------------------------
किमतीवरील वाद चिघळला
बामनडोंगरी येथे सिडकोने तयार केलेल्या घरांच्या किमती ३५ लाखांपर्यंत आकारल्या होत्या. या घरांच्या किमती कमी करण्याची मागणी सिडकोकडे अर्जदारांनी लावून धरली आहे. अशात गेल्या वर्षी जाहीर केलेल्या माझे पसंतीचे घर योजनेतील घरेसुद्धा वाढीव किमतीमुळे रखडलेली आहेत. वाशी आणि खारघर येथील घरांच्या किमती खासगी विकसकांच्या किमतीप्रमाणेच आहेत. याबाबत सिडकोने नगरविकास विभागाकडे अभिप्राय मागितला असल्याचे समजते आहे, परंतु संबंधित खात्याचे मंत्र्यांकडे बैठक होत नसल्याने हा विषय खितपत पडल्याची चर्चा आहे.
------------------------------------
अर्जदार हवालदील
नवी मुंबई शिवसेना शिंदे गटातर्फे वाशी येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरांच्या किमती कमी करण्याचे संकेत दिले. भाषण करताना आपण सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याकडे प्रस्ताव तयार करून आणायला सांगितल्याचे शिंदे यांनी जाहीर केले होते, परंतु त्यावर अद्याप निर्णय होत नसल्याने आता अर्जदार हवालदील झाले आहेत.
़़़़़़ः-------------------------------------------
विजेत्यांना घरांचा ताबा द्या ः अण्णा बनसोडे
सिडकोने माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या योजनेतील विजेत्या सदनिकाधारकांना घराचा ताबा देण्यासाठी वेळ निश्चित करा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सिडको प्रशासनाला दिले आहेत. याच अनुषंगाने विधान भवनात शुक्रवारी (ता. ११) बैठक घेण्यात आली. या बैठकीत घरांच्या अवाजवी किमती कमी करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. सिडकोने सामान्य नागरिकांचे हित लक्षात घेत सिडकोच्या प्रक्रियेतून बाद झालेल्या विजेत्यांना घरे मिळण्यासाठी पुन्हा संधी द्यावी. तसेच पूर्ण झालेल्या इमारतींमधील विजेत्यांना प्राधान्य देण्याची सूचना केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.