सोमेश्वरनगर, ता. १२ ः करंजेपूल- सोमेश्वर कारखाना या रस्त्यालगत ४० वर्षांपासून कारखान्याच्या जागेत ९० व्यावसायिकांची दुकानलाईन आहे. मात्र, कारखाना नऊपट मोठा झाल्याने रस्ता अपुरा पडत आहे. ऊस वाहतूक, विद्यार्थ्यांची ये- जा करण्यास अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर कारखाना व्यवस्थापनाने व्यावसायिकांना पुनर्वसनाचा प्रस्ताव दिला आहे. यासाठी काहींनी सहमती दर्शविली आहे. मात्र, अद्यापही बहुतांश व्यावसायिकांनी प्रस्ताव अमान्य केला आहे. यातून पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
सन १९६३ चा एक हजार टन प्रतिदिन क्षमतेचा सोमेश्वर कारखाना आता नऊ हजार टन झाला आहे. भव्य शिक्षण संकुल उभे झाले आहे. यामुळे करंजेपूल- कारखाना हा रस्ता अपुरा पडत आहे. ऊस वाहतुकीला अडथळे होत आहेत, शिवाय शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. छोटे- मोठे अपघात होत आहेत. विकसित कारखान्याकडे आता ऊसतोड मजुरांना उतरण्यासाठीसुद्धा जागा राहिली नाही. यामुळे व्यवस्थापनाने दुकानलाईन हलवून भाडेकरू व्यावसायिकांचे कारखान्याच्याच जागेत पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावास सुमारे ३५ लोकांनी मान्यता दिली आहे. बहुतांश लोकांनी मात्र प्रस्ताव अमान्य केला आहे.
कारखान्यासाठी शेतकरी सभासदांनी मोफत दिलेल्या जागेत कारखाना स्थापनेपासूनच अनेकांना व्यवसायासाठी भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून दिल्या होत्या. व्यावसायिकांनी सिमेंट बांधकाम, टपऱ्या, शेड उभारून दोन- तीन पिढ्या व्यवसाय केले. काहीजण निवासी आहेत, काहींचे अतिक्रमण आहे. या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या वार्षिक सभेत सभासदांनी कारखान्याच्या हितासाठी जागा मोकळ्या कराव्यात असा आग्रह धरला होता. कारखान्याच्या अध्यक्षांनी जाहीर सभेत पुनर्वसन करण्याचा शब्द दिला आहे. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कारखाना नऊ पट वाढलाय हा विचार करून भाडेकरूंनी पुनर्वसनाचा प्रस्ताव मान्य करावा, असे आवाहन केले आहे. यानंतरही बहुतांश भाडेकरूंनी नकार दिल्याने तूर्तास अतिक्रमणांवर हातोडा पडण्याची शक्यता आहे.
व्यावसायिक नितीन कुलकर्णी म्हणाले की, सन २०१० साली न्यायालयाने भाडेकरूंच्या बाजूने निकाल दिला आहे. तसेच, महेश सत्तेगिरी म्हणाले की, व्यवस्थापनाच्या अडचणी रास्त आहेत. मात्र, व्यावसायिकांचाही विचार झाला पाहिजे. तीन वेळा व्यवस्थापनासोबत बैठक झाली मात्र तोडगा निघू शकला नाही.
संचालक मंडळ व्यावसायिकांच्या पाठीशी
कारखान्याला स्वतःसाठी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे वार्षिक सभेत दुकानलाईन काढण्यासाठी सभासदांनी आग्रह धरला. अजित पवार यांनीही पुनर्वसन करू, असे आश्वासन दिले आहे. आमचे संचालक मंडळसुद्धा स्थानिक व्यावसायिकांच्या पूर्ण पाठीशी आहे. मात्र, त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले आहे.