सेवानिवृत्त अधिकाऱ्याची ४५ लाखांना फसवणूक
शेअर बाजारात जास्त नफ्याच्या प्रलोभनातून गुंतवणूक
अंबरनाथ पोलिसांत दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल, तपास सुरू
अंबरनाथ, ता. १४ (वार्ताहर): सेवानिवृत्त अधिकाऱ्याला शेअर बाजारात गुंतवणुकीचे प्रलोभन दाखवून तब्बल ४४ लाख ६७ हजार ८५५ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.
प्रकाश रामकृष्ण पाटील (वय ६०, रा. कोहोजगाव, अंबरनाथ पश्चिम) हे वस्तू, सेवा, कर विभागात अधिकारी होते व आता ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची आवड आहे. याच आवडीचा फायदा घेत २८ जुलै ते २३ सप्टेंबर या कालावधीत निराली संची आणि अनन्या मेहता या दोन महिला त्यांच्या संपर्कात आल्या. त्यांनी स्वतःला ‘जी ८ सिक्युरिटीज ग्रुप’ आणि ‘एल ८ मोतीलाल ओसवाल स्टॉक मार्केट लर्निंग ग्रुप’शी संबंधित असल्याचे भासवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस नफा मिळेल, असे प्रलोभन दाखवले. या महिलांनी फिर्यादी पाटील यांना अनधिकृत लिंक पाठवल्या आणि ‘‘आम्ही सांगितल्याप्रमाणे शेअर्स घेतल्यास दुसऱ्याच दिवशी ते जास्त किमतीत विकता येतील,’’ असे सांगून विश्वास संपादन केला. त्यांच्या सांगण्यावरून पाटील यांनी आपल्या विविध बँक खात्यांतून ४४ लाख ६७ हजार ८५५ रुपये इतकी मोठी रक्कम त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये गुंतवली.
काही दिवसांनी गुंतवलेली रक्कम परत मिळवण्यासाठी पाटील यांनी या दोन्ही महिलांशी संपर्क साधला असता, त्यांना ‘‘पैसे परत मिळवण्यासाठी आणखी रक्कम भरावी लागेल,’’ असे सांगण्यात आले. त्यानंतर या महिलांनी संपर्क तोडल्याने पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचा संशय आला. त्यांनी तत्काळ अंबरनाथ पोलिस ठाण्यात धाव घेऊन या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अंबरनाथ पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक (गुन्हे) उमेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
शहरात गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने नागरिकांच्या बँक खात्यांतील रक्कम वळती केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, तसेच अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी ती अधिकृत आहे का, हे तपासावे, असे आवाहन अंबरनाथ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शबीर सय्यद यांनी केले आहे.