शेकापच्या रोजगार मेळाव्याला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सुधागड तालुक्यातील १५० जणांना नेमणूक पत्र
पाली, ता. १४ (वार्ताहर) : भारतीय शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि पक्षाचे खजिनदार अतुल म्हात्रे यांच्या संकल्पनेतून पाली येथील आयोजित रोजगार मेळाव्याला युवक-युवतींचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात सुधागड तालुक्यातील १५० युवक-युवतींना नोकरीच्या नेमणूक पत्रांची वाटप करण्यात आली.
या रोजगार मेळाव्याचे आयोजन रायगड जिल्हा शेकाप चिटणीस सुरेश खैरे आणि तालुका चिटणीस अतिष सागळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. पाली मराठा समाज हॉल येथे झालेल्या या मेळाव्यात ५०० हून अधिक युवक-युवतींनी रोजगार मेळाव्यात सहभाग घेतला. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, एचआर अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ यांनी उपस्थित राहून उमेदवारांना रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. संचालक प्रशांत कांबळे यांनी उपस्थित तरुणांना उपलब्ध उद्योग क्षेत्रे, कौशल्य विकास आणि योग्य करिअर मार्गदर्शन याबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हा चिटणीस सुरेश खैरे म्हणाले, सुधागड तालुक्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगार निर्माण करणे ही काळाची गरज आहे. आमदारकीची निवडणूक जिंकली नाही, तरी दिलेले आश्वासन पाळत अतुल म्हात्रे यांनी गेल्या काही महिन्यांत रायगड जिल्ह्यात १७ रोजगार मेळावे आयोजित केले. आजचा हा १८ वा रोजगार मेळावा सुधागडच्या तरुणांसाठी नव्या आशेचा किरण ठरेल, तर अतुल म्हात्रे यांनी सांगितले की, विकास हा सर्वांगीण असला पाहिजे. आज रोजगार शोधणारे अनेक तरुण येथे आले आहेत, त्यातील ज्यांना नोकरी मिळाली नाही, त्यांनाही लवकरच संधी मिळेल. आमचा उद्देश रायगडमधील भूमिपुत्रांना स्वावलंबी व उद्योजक बनवणे हा आहे.”