Pathardi Reservation: 'कासार पिंपळगाव' ठरवणार सभापती; नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, इच्छुकांत खुशीचा माहोल
esakal October 15, 2025 06:45 AM

-उमेश मोरगावकर

पाथर्डी: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणांच्या  आरक्षणात  काही अपवाद वगळता जुन्या चेहऱ्यांना परत एकदा संधी मिळणार असल्याने व नव्या चेहऱ्यांना सुद्धा वाव असल्याने  तालुक्याच्या राजकारणात खुशीचा माहोल दिसून येत आहे.

MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात!

आज अहिल्यानगर येथे जिल्हा परिषदेच्या ५  गटांचे,  तर पंचायत समितीच्या १० गणांचे आरक्षण तहसील कार्यालयात प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, नायब तहसीलदार दिग्विजय पाटील, रवींद्र शेकटकर व दादासाहेब वावरे यांच्या उपस्थितीत काढण्यात आले. पंचायत समितीच्या सभापतीचे आरक्षण हे अनुसूचित जाती महिला असून, हे आरक्षण  कोणत्या गणात पडते, या विषयी मोठी उत्कंठा होती. हे आरक्षण आमदार मोनिका राजळे यांचे होमग्राऊंड असलेल्या कासार पिंपळगाव गणात पडल्याने विद्यमान सदस्य  विष्णुपंत अकोलकर यांची संधी हुकली. या गणातून  राजळे देतील तो उमेदवार विजयी होणार असल्याने  कोणाला उमेदवारी द्यायची, याची डोकेदुखी राजळे यांना होणार आहे.

या गणातून सध्या राजळे यांचे निकटवर्ती नितीन एडके यांच्या मातोश्री  सुनीता राजेंद्र  एडके, सुनीता चंद्रकांत  पाचरणे, अनिता विलास गजभिव, कांचन सुनील परदेशी, संगीता  काका शिंदेंसह अनेक जण इच्छुक आहेत.  इतर नऊ  गणांपैकी सात गणांतील सर्वच विद्यमान उमेदवारांना  पुन्हा एकदा संधी मिळू शकते किंवा या ठिकाणी नवीन चेहरेही उभे राहू शकतात. जिल्हा परिषदेचे जे पाच गट आहेत, त्या गटांतून पूर्वीच्याच सर्व सदस्यांना  पुन्हा एकदा उभे राहण्याची संधी मिळू शकते. ढाकणे  यावेळी आपले पुत्र ऋषिकेश ढाकणे यांना उभे करू शकतात, तर  अर्जुनराव शिरसाठ यांना यावेळी आपल्या पत्नीलाच उभे करावे लागणार आहे. 

तालुक्यात  राजळे यांचा मोठा प्रभाव असला, तरीही भालगाव व टाकळी मानूर गटात व गणात  त्यांना  कसरत करावी लागणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रताप ढाकणे सध्या सक्रिय नसले, तरीही निवडणूक काळात ते काय करतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. या  निवडणुका  लांबल्याने  अनेक नवीन  चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्यास इच्छुक असल्याने सर्वच पक्षाच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

UPSC Success Story:'यूपीएससी परिक्षेत डिस्कळच्या दीपालीचा राज्यात डंका';आयएसएस अधिकारीपदी निवड; दोन्ही जुळ्या बहिणींचे सुयश

आमदार शिवाजीराव गर्जे यांनी सुद्धा  निवडणुकीची तयारी चालवली असून, काही गणांत व गटांत ते आव्हान उभे करू शकतात. तिसगाव  व करंजी गटांत आमदार शिवाजीराव कर्डिले  विरोधात माजी मंत्री  प्राजक्त तनपुरे असा सामना रंगेल, तर उर्वरित तीन गटांत राजळे विरोधात गर्जे व माजी आमदार चंद्रशेखर घुले, असा सामना रंगेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.