Sangamner Panchayat Samiti: संगमनेर पंचायत समितीसाठी 'राखीव'मुळे समीकरणे बदलणार; १८ गणांतून ९ महिलांना संधी
esakal October 15, 2025 06:45 AM

संगमनेर : संगमनेर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. १३) १८ गणांसाठी आरक्षण निश्चित करण्यात करण्यात आले आहे. यामध्ये ९ जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत. प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी अरुण उंडे व तहसीलदार धीरज मांजरे यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत पार पडली.

MPSC Success Story:'लिंबच्या सुनबाईची कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी';'एमपीएससी'त साधली हॅट्रिक, वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात!

याआधीच पंचायत समितीच्या सभापती पदासाठीची आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून, हे पद अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेली उत्सुकता आणि तणाव आता काही अंशी निवळला आहे. या आरक्षण सोडतीमुळे पंचायत समितीच्या सभागृहात यंदा महिलांचा ठसा स्पष्टपणे उमटणार आहे. १८ गणांपैकी ९ जागा महिला उमेदवारांसाठी राखीव असल्या कारणाने महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.

तथापि, अनेक राजकीय इच्छुकांसाठी ही सोडत ‘हिरमोड’ ठरली आहे. काही इच्छुकांनी आधीपासूनच तयारी सुरू केली होती, परंतु आरक्षणामुळे त्यांना थांबावे लागले आहे. त्यामुळे आता राजकीय पक्ष आणि स्थानिक नेत्यांनी नव्या चेहऱ्यांच्या शोधासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर तालुक्यात महत्त्वाचे राजकीय समीकरण बदलताना दिसले. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची तालुक्यावर दीर्घकाळ एकहाती सत्ता होती.

मात्र, त्यांचा आमदार अमोल खताळ यांच्याकडून पराभव झाला. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका अधिकच चुरशीच्या होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आरक्षण सोडतीनंतर उमेदवारांनी आपले गण व संभाव्य मतदारसंघ पाहून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार, हे निश्चित आहे.

UPSC Success Story:'यूपीएससी परिक्षेत डिस्कळच्या दीपालीचा राज्यात डंका';आयएसएस अधिकारीपदी निवड; दोन्ही जुळ्या बहिणींचे सुयश

संगमनेर पंचायत समिती गण निहाय आरक्षण सोडत पुढील प्रमाणे : १. निमोणः नागरिकांचा मागास प्रवर्ग, २. समनापूर ः नागरिकांचा मागास प्रवर्ग, ३. तळेगाव ः सर्वसाधारण, ४. वडगाव पान ः अनुसूचित जाती महिला, ५. आश्वी बुद्रुकः सर्वसाधारण महिला, ६. आश्वी खुर्द ः सर्वसाधारण महिला, ७. जोर्वे ः सर्वसाधारण महिला, ८. अंभोरे ः सर्वसाधारण, ९. घुलेवाडी ः अनुसूचित जाती, १०. गुंजाळवाडी ः नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ११. राजापूर ः सर्वसाधारण, १२. धांदरफळ बुद्रुक ः सर्वसाधारण महिला, १३. संगमनेर खुर्द ः सर्वसाधारण महिला, १४. चंदनापुरी ः सर्वसाधारण, १५. खंदरमाळवाडीः अनुसूचित जमाती, १६. बोटा ः अनुसूचित जमाती महिला, १७. पिंपळगाव देपाः सर्वसाधारण, १८. साकूरः नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.