Tata Motors: टाटा मोटर्सचा शेअर 40 टक्क्यांनी घसरला; शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
esakal October 15, 2025 06:45 AM

Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. शेअर बाजार उघडताच कंपनीचा शेअर ₹660.90 वरून थेट ₹399 वर घसरला. जवळपास 40 टक्क्यांची घसरण पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली. परंतु, ही घसरण कंपनीच्या आर्थिक अडचणींमुळे नाही, तर टाटा मोटर्सच्या डीमर्जरमुळे (Demerger) झाली आहे.

डीमर्जर म्हणजे काय?

टाटा मोटर्सने आपला व्यवसाय दोन स्वतंत्र घटकांमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचा कमर्शियल व्हेइकल्स विभाग आणि पॅसेंजर व्हेइकल्स विभाग आता स्वतंत्र कंपन्यांच्या स्वरूपात काम करणार आहेत.

याआधी टाटा मोटर्सचा शेअर या दोन कंपन्यांचा नसून एकाचा कंपनीचा होता. मात्र आता कंपनीने आपला कमर्शियल व्हेइकल्स विभाग नव्याने स्थापन झालेल्या TML Commercial Vehicles Ltd (TMLCV) मध्ये हस्तांतरित केला आहे.

त्यामुळे सध्याचा टाटा मोटर्सचा शेअर हा फक्त पॅसेंजर व्हेइकल्स विभागाचा आहे. त्यामुळेच शेअरच्या किंमतीत झालेली घसरण ही कंपनीच्या आर्थिक अडचणीमुळे झाली नाही, तर दोन विभाग केल्यामुळे झाली आहे.

Gold Price Today: सोन्याचे भाव गगनाला भिडले; चांदीची चमकही वाढली, काय आहे आजचा भाव? गुंतवणूकदारांना नवीन शेअर्स कसे मिळतील?

टाटा मोटर्सने 14 ऑक्टोबर 2025 ही ‘रेकॉर्ड डेट’ म्हणून निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत ज्यांच्याकडे टाटा मोटर्सचे शेअर्स आहेत, त्यांना त्यांच्या प्रत्येक शेअरच्या बदल्यात TMLCV कंपनीचा एक शेअर दिला जाणार आहे.

यामुळे गुंतवणूकदारांची मालकी आता दोन भागांत विभागली जाईल, एक भाग पॅसेंजर व्हेइकल्स व्यवसायात आणि दुसरा भाग कमर्शियल व्हेइकल्स व्यवसायात. नवीन TMLCV शेअर्सचे ट्रेडिंग नोव्हेंबर 2025 पासून बीएसई आणि एनएसईवर सुरू होण्याची अपेक्षा आहे.

Premium|Gold Buying Guide: दिवाळीत सोनं घ्यायचं असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

शेअर बाजारात अचानक घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्येथोडी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या एकूण गुंतवणुकीच्या मूल्यावर फारसा परिणाम झालेला नाही.

उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे टाटा मोटर्सचा एक शेअर ₹660 किमतीचा होता, तर सध्या तो सुमारे ₹400 पर्यंत खाली आला आहे. परंतु, त्याचबरोबर तुम्हाला नवीन TMLCV चा एक शेअरही मिळेल, ज्याची संभाव्य किंमत अंदाजे ₹260 इतकी असू शकते. म्हणजेच दोन्ही मिळून तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य पूर्वीप्रमाणेच राहते.

गुंतवणूकदारांना फायदा होणार का?

टाटा मोटर्सच्या डीमर्जरचा निर्णय कंपनीसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी लाँगटर्ममध्ये फायद्याचा ठरु शकतो. दोन्ही विभाग आता स्वतंत्रपणे व्यवसायिक निर्णय घेऊ शकतील, अधिक लक्ष देऊन धोरण आखू शकतील आणि त्यामुळे त्यांच्या वाढीचा वेगही वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअरच्या भावातील घसरण ही आर्थिकअस्थिरतेमुळे झाली नाही. टाटा मोटर्सच्या इतिहासात डीमर्जरचा हा टप्पा महत्त्वाचा मानला जातो, कारण या प्रक्रियेमुळे कंपनीचा प्रत्येक विभाग स्वतंत्र निर्णय घेणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.