Diwali Festival: दिवाळीत धारावी कुंभारवाड्यातील पणत्यांना मागणी; सुबक, वाजवी दरात दिवे उपलब्ध
esakal October 15, 2025 12:45 AM

धारावी : दसरा संपून दिवाळीच्या लगबगीला सुरुवात झाली आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण. संपूर्ण घर पणत्यांच्या व दिव्यांच्या रोषणाईने झळाळून निघते. धारावीतील कुंभारवाडा हा दिवे व पणत्यांसाठी प्रसिद्ध बाजार. इतर कोणत्याही ठिकाणांपेक्षा या ठिकाणी अतिशय सुबक आणि वाजवी दरात दिवे व पणत्या मिळतात.

धारावीतील कुंभारवाडा येथे विक्रेत्यांनी विविध प्रकारच्या, आकाराच्या पणत्या, दिवे, विविध प्रकारचे साहित्य सजवून विक्रीस ठेवले आहे. मुंबईच्या विविध भागांतून खरेदी करण्यास सर्वसामान्य लोकांसह चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळी, राजकीय नेते येथे येतात. दीपोत्सवाला सजवणाऱ्या विविध पणत्या मोठ्या प्रमाणावर इथूनच खरेदी केल्या जातात. दिवाळी सणात येथे मोठी आर्थिक उलाढाल होते. एक रुपयापासून ते हजार रुपयांपर्यंतच्या पणत्या व दिवे इथे विक्रीसाठी ठेवले आहेत.

मुंबई आणि पुण्यातील 'या' भागात फटाक्यांची विक्री होणार नाही, यादी आताच पाहून घ्या...

धारावीकुंभारवाड्यात गेल्या अनेक वर्षांपासून कुंभार समाजातील लोक हा व्यवसाय करीत आहेत. यातील काही कुटुंबे मडकी बनवण्याचा पिढीजात धंदा करीत आहेत. तर काही कुटुंबे तयार दिव्यांवर कलाकुसर करण्याचे काम करीत आहेत. पूर्वी दिव्यांना कच्च्या रंगाने रंगवले जायचे. त्यानंतर ब्रशचा वापर करून रंग दिले जात होते; परंतु बदलत्या काळानुसार सध्या ऑईल पेंटने दिव्यांना रंग दिला जातो.

पोटाला चिमटा घेत व्यवसाय जपण्याचा प्रयत्न

हजारो दिवे, पणत्या रंगवून होलसेल व रिटेलमध्ये विकल्या जातात; पण म्हणावा तसा आर्थिक फायदा होत नाही. आपल्या पूर्वजांनी सुरू केलेले कार्य बंद पडू नये, यासाठी पोटाला चिमटा घेऊन हे काम करीत आहेत. चित्रोड यांच्या घरातील पाच व्यक्ती हे काम करतात. तयार दिवे, पणत्या मुंबईतील इतर भागात विकतात. या वस्तीत तरुण मुले-मुली शाळा, महाविद्यालय शिकत कामात मदत करतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.