जव्हार, ता. १४ (बातमीदार) : नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी युती, आघाडीसंदर्भात पदाधिकारी व नेतेमंडळींमध्ये हालचाली होत असतानाच थेट जनतेतून खुल्या प्रवर्गातून महिला आरक्षण लागू झाल्याने अध्यक्षपदाच्या जागेवरून पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू झाली आहे. अध्यक्षपदाची जागा न मिळाल्यास पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस होऊन असंतोष बाहेर येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर जव्हार शहरातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांनी पक्षाची उमेदवारी गृहीत धरून निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे. नगराध्यक्ष व प्रभागाची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर त्या दृष्टीने इच्छुकांनी तयारी चालवली आहे. महिलांसाठी आरक्षित झालेल्या जागेवर इच्छुकांनी आपल्या कुटुंबातील महिलेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी केली. त्यातही आता नगराध्यक्षपदासाठी बाशिंग बांधून बसलेल्या सर्वच पक्षांतील इच्छुकांनी शेवटच्या टप्प्यात उमेदवारी आपल्याला मिळावी, याकरिता पक्ष नेतृत्वाकडे आग्रह धरला आहे. युती किंवा आघाडी झाल्यास कुठल्याही परिस्थितीत नगराध्यक्षपदाची जागा आपल्याच पक्षाला सोडवून घेण्याकरिता इच्छुकांनी पक्षनेतृत्वाला गळ घालून ठेवली. त्यामुळे पुढील काळात मित्रपक्षांकडून एकत्र येत निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्यास आपल्या अपेक्षेवर पाणी पडणार नाही, याकरिता डावपेच टाकले जात आहेत.
आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. महायुतीमधील शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र येणार का, यावर प्रश्नचिन्ह आहे. शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्षासह निवडणूक लढविण्याची तयारी करण्यात आली. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्यामध्ये आघाडी झाल्यास नगराध्यक्षपदाची दावेदारी नेमके कोण असेल, हे ठरवण्यासाठी महाविकास आघाडीकडूनही उमेदवारी मागण्याच्या हालचाली सुरू आहेत.
जव्हारमध्ये महाविकास आघाडीकडून एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर, कुठल्याही परिस्थितीमध्ये नगराध्यक्षपद शिवसेनेकडे राहिले पाहिजे, या दृष्टीने पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राजकीय डावपेच टाकणे सुरू केले. कदाचित शेवटच्या टप्प्यात काही उलटफेर झाल्यास पालिका निवडणुकीच्या तोंडावरच पक्षांतर्गत असंतोष बाहेर पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. पुढील काही दिवसांत पालिका निवडणुकासंदर्भात युती, आघाडीबाबत निर्णय झाल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल.