फ्रिज-एसी दुरुस्तीचे साहित्य चोरणारी टोळी जेरबंद
ठाणे ग्रामीण पोलिसांची यशस्वी कामगिरी; पसार महिलेचा शोध सुरू
सकाळ वृत्तसेवा, ठाणे, ता. १४ : इमारतीच्या जिन्याजवळील मीटर बॉक्सखाली ठेवलेले फ्रिज आणि एसी दुरुस्तीचे साहित्य तसेच दुरुस्तीसाठी आणलेला १५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल चोरणाऱ्या एका महिला टोळीचा पर्दाफाश करण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील तीन महिलांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे; मात्र या टोळीतील अन्य एका पसार महिलेचा शोध सध्या सुरू आहे.
वासिंद येथील गावदेवी मंदिराजवळील भारमल अपार्टमेंटमध्ये राहणारे विजय व्यापारी यांनी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिन्याजवळील मीटर बॉक्सखाली फ्रिज व एसी दुरुस्तीचे साहित्य आणि दुरुस्तीसाठी आणलेला १५ हजार १०० रुपयांच्या वस्तू ठेवल्या होत्या. या सर्व वस्तू चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी वाशिंद पोलिसांत नोंदवली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाशिंद पोलिस आणि ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांनी समांतर तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शहापूर येथील राधा कुणाल वेखंडे (२५), सोनू अरुण गौतम (२७), आणि नीता महादेव साठे (२६) यांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान या तिघींनी पसार असलेल्या सीमा रवी वाघमारे हिच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून १५ हजार १०० रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून, या तिघींना वाशिंद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गीते यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास वाशिंद पोलिस करत आहेत.