अल्बिनिझमग्रस्त आजाराने त्याची दृष्टी ९० टक्के गेली. पण, तो रडत-कुढत बसला नाही. हताशही झाला नाही. आता केवळ १० टक्के दृष्टी असताना १०० टक्के आत्मविश्वास घेऊन रोज सायकलवरून सकाळी घरोघरी वृत्तपत्र वाटतो. त्यामुळे हाताला काम नाही म्हणणाऱ्या तरुणांसाठी तो आदर्श ठरला. हा प्रेरणादायी प्रवास आहे तो संजयनगर येथील ४१ वर्षीय सुनील महाजन यांचा.
अल्बिनिझमग्रस्त आजाराने त्याची दृष्टी ९० टक्के गेली. पण, तो रडत-कुढत बसला नाही. हताशही झाला नाही. आता केवळ १० टक्के दृष्टी असताना १०० टक्के आत्मविश्वास घेऊन रोज सायकलवरून सकाळी घरोघरी वृत्तपत्र वाटतो. त्यामुळे हाताला काम नाही म्हणणाऱ्या तरुणांसाठी तो आदर्श ठरला. हा प्रेरणादायी प्रवास आहे तो संजयनगर येथील ४१ वर्षीय सुनील महाजन यांचा.
सुनील यांचे कुटुंब मूळ जळकी (ता. सिल्लोड) येथील. त्यांचे वडील मुरलीधर महाजन कामानिमित्त शहरात आले. मोंढ्यातील एका दुकानात मजूर म्हणून काम करत संसाराचा गाडा हाकला. सुनील यांचा जन्मही येथेच झाला. संजयनगर परिसरात ते लहानाचे मोठे झाले. पण, जन्मतःच त्यांना अल्बिनिझम या आनुवंशिक आजाराने ग्रासले. यात त्यांना ९० टक्के दृष्टिदोष आहे. पण, आपल्या दिव्यांगपणाचे भांडवल न करता ते आयुष्याला सामोरे जात आहेत. आई-वडिलांनीही त्यांना कधी ते दिव्यांग असल्याचे जाणवू दिले नाही. सामान्य मुलांच्या शाळेतच शिकवले. चौराहा येथील गुजराती शाळेतून सुनील यांनी दहावी पूर्ण केली. बारावीपर्यंतचे शिक्षण शिवाजी हायस्कूल येथून पूर्ण केले. बोर्डावरील अक्षरे दिसत नसतानाही मित्रांच्या वहीत पाहून लिहिले, शिकले. घरात लहान भाऊ-बहीणही होते. आई गृहिणी. केवळ जिद्दीच्या बळावर त्यांनी हे शिक्षण पूर्ण केले.
शिक्षणासोबतच कामनववीत असतानाच (वर्ष २००२) वडिलांना मदत करण्यासाठी सुनील यांनी पीसीओमध्ये पार्ट टाइम काम सुरू केले. त्यानंतर रेल्वेस्टेशन येथून सायकलवर पार्सल आणण्याचे कामही त्यांनी काही दिवस केले. मात्र, दोन-तीनवेळा अल्पदृष्टीमुळे अपघात झाल्याने ते काम सोडावे लागले. ओळखीतील एका पेपर एजन्सीवर त्यांनी पेपर वाटायला सुरवात केली. सुरवातीला ते शंभर पेपर वाटायचे. त्यांना माणूस दिसतो. पण, त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव दिसत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी काम मिळायला अडचण झाली. त्यामुळे पेपर वाटण्याचेच काम पुढे वाढवले. दरम्यान, सरकारी नोकरीसाठी चतुर्थश्रेणी पदांसाठी त्यांनी अर्ज केले. पण, परीक्षा शुल्काचा खर्च आणि इतर शहरांत परीक्षा केंद्र मिळाल्यास तिथे जाण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे त्यात त्यांना यश आले नाही.
धडपड आजही कायमसध्या सुनील शहागंज ते संजयनगर परिसरातील सुमारे दीडशे घरांमध्ये रोज सकाळी पेपर वाटतात. त्यातून त्यांचा खर्च भागत आहे. भाऊ अनिलच्या मदतीने त्यांचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू आहे. दृष्टी कमी असल्याने स्क्रीन दहा मिनिटांपेक्षा जास्त पाहू शकत नाहीत. उन्हाचा त्रास होत असल्याने त्यांना दिवसभर घरीच राहावे लागते.
अल्बिनिझम म्हणजे काय?अल्बिनिझम एक आनुवंशिक स्थिती आहे. सध्या यावर कोणताही इलाज नाही. ज्यामुळे त्वचा, केस आणि डोळे खूप फिकट रंगाचे किंवा रंगहीन होतात; कारण शरीरात मेलेनिन या रंगद्रव्याची कमतरता असते. मेलेनिन त्वचेला, केसांना आणि डोळ्यांना रंग देते. या स्थितीमुळे दृष्टिदोष होऊ शकतो. पण, इतर कोणत्याही बाबतीत अल्बिनिझम असलेल्या व्यक्ती निरोगी असतात.
‘कर्तव्याचा उत्सव’भल्या पहाटेच्या थंडगार वाऱ्यात, पावसाच्या सरीत, वर्षाच्या तिन्ही ऋतुंमध्ये जेव्हा जग झोपेत असतं, तेव्हा आपण जगाला जागं करणारे असता. आपल्या हातातून पोचणारे प्रत्येक वृत्तपत्र ज्ञान, विचारा आणि जागृतीचा प्रवास असतो. आपण रोज सकाळी केवळ कागद पोचवत नाही, तर मनात विचारांचा प्रकाश पेटवत असता. आजच्या डिजिटल युगातही, आपली निष्ठा आणि सेवा हीच खरी समाजाची माहितीची नाळ जिवंत ठेवते. आपल्या कष्टात सामाजिक बांधिलकी आहे. प्रत्येक दिवस म्हणजे एक ‘कर्तव्याचा उत्सव’ आहे, जो अब्दुल कलाम सरांच्या विचारांसारखाच प्रेरणादायी आहे. वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त, आपल्या मेहनतीला, निष्ठेला आणि सेवाभावाला सलाम!
- अण्णासाहेब जगताप, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना