राजकीय वादविवादापासून दूर, विकासावर लक्ष
राज्यमंत्री योगेश कदम ः शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १४ ः पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे. राजकीय वादविवादांपेक्षा माझे लक्ष मतदारसंघातील विकासकामांवर आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यावर केंद्रीत असल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
मंडणगड येथे १३ ऑक्टोबरला माध्यमांशी संवाद साधताना मंत्री कदम म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमी आंबडवे (ता. मंडणगड) या गावाचा विकास आराखडा शासनाने अंतिम टप्प्यात नेला आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय स्मारक येथे उभारण्यात येणार आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनुसार, भूसंपादन करून हे स्मारक उभारले जाईल. समाजकल्याण विभागाला यासंदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, शहरप्रमुख विनोद जाधव, संदेश चिले, अस्मिता केंद्रे, इरफान बुरोंडकर, संजय शेडगे, चेतन सातोपे, दीपक मालुसरे, सिद्धेश देशपांडे, नीलेश मोरे आदी उपस्थित होते.
चौकट
भास्कर जाधव यांची योग्यता नाही
पत्रकारांनी आमदार भास्कर जाधव यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कदम म्हणाले, भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर टीका करावी इतकी त्यांची योग्यता नाही. भूतकाळात ते स्वतःच त्यांच्याकडून आशीर्वाद घेत असत, असा टोला त्यांनी लगावला.