जेवणाच्या ताटात शाम्पूचे पाणी टाकले, संतापाने डोक्यात लोखंडी फावडे घालून सहकाऱ्याची हत्या
Tv9 Marathi October 16, 2025 04:45 AM

नाशिक – एका मजूराचा बंद घरात मृतदेह आढळल्याची घटना १४ ऑक्टोबर रोजी नांदूर शिंगोटे येथे सकाळी उघडकीस आली होती. त्यानंतर पोलिसांना या प्रकरणात मृतदेहाला पोस्टमार्टेमला पाठवून दिले होते. राजेंद्रकुमार ऊर्फ राजनकुमार सूरज साव (वय 35) या मजुराच्या डोक्यावर उजव्या बाजूला लोखंडी वजनाच्या हत्याने दुखापत करून अज्ञात व्यक्तीने त्याची हत्या केली होती. या प्रकरणात वावी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अखेर आठ तासांत या गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे.

ही हत्या जवळच्या व्यक्तीने केल्याचा पोलिसांना संशय होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक बाळासाहेब मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांनी पोलीसांची विविध पथके स्थापन करुन त्यांना तपास वेगाने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली आणि मयत राजेंद्रकुमार शेवटचा कोणाकोणला भेटला होता. याचा तपास सुरु करायला सुरुवात केली. अखेर तपासाची चक्रे शिताफीने फिरवून राजेंद्र कुमार याचा सहकारी अजय सुभाष गाडेकर (वय 33, रा. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) याला नांदूर शिंगोटे येथून त्याब्यात घेतले. त्याची चौकशी करताना त्याने अखेर पोलीसांच्या प्रश्नाना उत्तरे देताना गुन्ह्याची कबुली दिली.

ताटात शाम्पूचे पाणी टाकले

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर आणि वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी या तपासात महत्वाची भूमिका बजावली. आरोपी अजय गाडेकर आणि मयत राजेंद्र कुमार यांच्या कोणत्यातरी कारणाने भांडणे झाली होती. घटनेच्या दिवशी राजेंद्रकुमार याने आरोपीच्या जेवणाच्या ताटात शाम्पूचे पाणी टाकले. त्याचा राग आल्याने आरोपी अजय गाडेकर याने रागाने राजेंद्रकुमारच्या डोक्यात लोखंडी फावड्याने वार केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने कोणाला संशय येऊ नये म्हणून दाराला बाहेर कडी लावून स्वत: घराच्या बाहेरील पिकअपमध्ये रात्र काढूली. गुन्हे शाखेने आरोपी अजय गाडेकर याला वावी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.